(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''जातीसाठी माती खाऊ नका,मला दिल्लीला पाठवून सन्मानित करा''; बीडमधील मेळाव्यात पंकजा आक्रमक
Pankaja Munde: बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड येथील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर पंकजा मुंडेंनी भाषण केलं.
बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असून बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा यांना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांचं आव्हान आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, येथील निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जेवढी आहे, तेवढीच ओबीसी (OBC) विरुद्ध मराठा अशीही रंगत असल्याचं दिसून येत आहे. पंकजा मुंडेंना काही ठिकाणी मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागल्याचेही दिसून आले. आता, पंकजा मुंडेंनी थेट मराठा (Maratha) समाजाला साद घातली आहे. जातीसाठी माती खाऊ नका, असे म्हणत पंकजा मुंडेंनी आपण जात-पात मानत नाही, स्व. गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आपल्यावर आहेत,असे म्हटले.
बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड येथील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर पंकजा मुंडेंनी भाषण केलं. ही निवडणूक आता तुम्ही हातात घ्या, मला बैठका किंवा सभा घ्यायला लावू नका. राज्यातून साडे तीन खासदार निवडून येणाऱ्याला निवडून देणार की, 350 खासदार निवडून येणाऱ्या पक्षाला मतदान करणार?, असा सवाल पंकजा मुंडेंनी मेळाव्यात उपस्थितांना केला.संदीपान घुमरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रचाराला पंकजाताई जातात, मग बीडमध्ये मला मतदान करणार नाहीत का? असेही त्यांनी म्हटले.
जातीसाठी माती खाऊ नका
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीपातीचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा ठरवणारे केंद्रस्थळ म्हणून बीडकडे पाहिले जाते. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसून येत आहे. या संघर्षावर बोलताना, जातीसाठी माती खायची नाही, मातीसाठी जात संपुष्टात आणायची आहे, असे म्हणत पंकजा यांनी केवळ जातीचा उमेदवार म्हणून मतदान करू नका, असे आवाहनही केले. सगळे पक्ष आता एकत्र झाले आहेत, कामाला लागा मला दिल्लीला पाठवून सन्मानित करा, असेही त्यांनी म्हटले.
मुस्लीम बांधवांच्या केसालाही धक्का लागणार नाही
मी विजयी होणार आहे, मला आत्मविश्वास आहे, आपलं काम सत्कर्मी करा, प्रत्येक बुथवर आपले माणसे असायला हवीत. जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास आहे, आम्ही वंचितांची लढाई लढत आहोत. या निवडणुकीत कुठलाही मुद्दा राहिला नाही, केवळ बुद्धी भेद केला जात आहे. मुस्लीम बांधवांच्या केसालाही धक्का लागणार नाही. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान बदलण्याची कोणाचीही पात्रता नाही. आमच्या आयुष्यात जात धर्म कधीही मानला नाही, आम्हाला मुंडे साहेबांची शिकवण आहे. साहेबांनी आम्हाला सर्वसमावेशक राजकारण शिकवले आहे, अशी भावनिक सादही पंकजा मुंडेंनी मतदारांना केले आहे.