'आम्ही सांगू त्याला उमेदवारी दिली नाही तर..' लक्ष्मण हाके कडाडले, म्हणाले," महाराष्ट्र कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही"
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही ओबीसी उमेदवार देणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणालेत.
Nanded: राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना आगामी विधानसभेसाठी ओबीसी कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसलं. आम्ही ज्याला सांगू त्याला उमेदवारी दिली नाही किंवा सत्तेतले पक्ष पुन्हा ड्रायव्हरला तिकीट दे, सांगकामे, मान डोलावणाऱ्याला तिकीट देणार असेल तर ओबीसी हे चालू देणार नसल्याची आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. नांदेडमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
विधानसभेपूर्वी लक्ष्मण हाके कडाडले..
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी प्रश्नामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांसह मराठा समाजाला ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पश्चिम दौरा केला. तर दुसरीकडे वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाओ यात्रा काढत ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध केला. आता ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ॲक्टीव्ह मोडवर आल्याचं दिसत असून विधानसभेत ओबीसी उमेदवार देणार असल्याचं ते म्हणालेत.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
लक्ष्मण हाके म्हणाले," जो पक्ष ओबीसीच्या विचारांना, आम्ही सांगू त्याला उमेदवारी देईल त्याला ओबीसी मतदान करेल. नाहीतर सत्तेतले पक्ष पुन्हा ड्रायव्हरला तिकीट दे, सांगकामे, मान डोलावणाऱ्याला तिकीट देणार असेल तर ओबीसी हे चालू देणार नाही."
विधानसभेसाठी ओबीसी उमेदवार देणार
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही ओबीसी उमेदवार देणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणालेत. महाराष्ट्र कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही. अठरापगड जातींचं हे राज्य आहे. हे आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेत दाखवून देऊ, असा इशारा देत त्यांनी सरकारवर टीका केली. दरम्यान आज विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी टाळ कुटणाऱ्यांना मतदान केलं तर १९९० च्या आधीची परिस्थिती येईल असं विधान केलंय..
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकरांनी धनगर समाजाला राजकीय आवाहन केलंय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आरक्षणवाद्यांना मतदान करा. टाळ कुटणाऱ्यांना मतदान केलं तर 1990 च्या आधीची परिस्थिती येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. येणाऱ्या विधानसभेत आरक्षणाला धोका आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाची शिडी वाचवायची की नाही? याचा विचार धनगर समाजाने करावा, असा त्यांनी यावेळी म्हटले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, येणाऱ्या काळात काही मोठ्या घडामोडी होणार आहेत. त्यासाठी जनतेने तयार राहावं, असं म्हणत भविष्यात मोठे राजकीय घडामोडींचे सुतोवाच त्यांनी केले आहे. ते अकोला येथे धनगर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
हेही वाचा: