Nitesh Rane: जरांगे पाटील भावाला चिचुंद्री म्हणाले; निलेश राणे संतापले, म्हणाले, नितेशवर तुम्ही टीका करा पण...
चिंचुद्रीचे कधी पाय मोजता आले आहेत का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही.

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता राजकीय टोलेबाजी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांची भेट घेतल्याने महायुतीमधील नेते थेट जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजकीय असल्याचे म्हणत आहेत. त्यावरुनच, जरांगे पाटील हेही संबंधितांवर पलटवार करतात. भाजप नेते नितेश राणे यांच्यावर बोचऱ्या शब्दात जरांगे पाटलांनी टीका केली होती, तसेच चिचुंद्री म्हणत आंदोलन झाल्यावर बघतोच, असेही म्हटले होते. आता, या टीकेवरुन शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलंय. तत्पूर्वी नितेश राणेंनीही जरांगे पाटील आता माझ्यावर टीका करणारच, कारण त्यांचे अब्बा स्टेजवर जाऊन त्यांची भेट आहेत, असे पलटवार केला होता. अबू आझमी आणि एमआयएमच्या नेत्यांच्या भेटीनंतर राणेंनी अशी टीका केली होती.
चिंचुद्रीचे कधी पाय मोजता आले आहेत का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही. त्यामुळे एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच, असा सज्जड दम जरांगे पाटलांनी दिला होता. जरांगे पाटलांच्या या टीकेवर आता राणे बंधू भडकले असून नितेश राणेंनंतर आता, त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनीही जोरदार पलटवार केला आहे.
''नितेश राणे एखाद्या विषयावर बोलल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही, किव्हा वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो. आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हाथ टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे कारण आम्ही तुम्ही काही परके नाही. विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशा शब्दात निलेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर पलटवार केला आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले, कौटुंबिक राहिले ते तसेच राहिले पाहिजे. मी आजपर्यंत नातं जपलं, पुढेही जपेन… आपल्याकडून पण तीच अपेक्षा आहे,'' असेही आमदार निलेश यांनी म्हटलंय.
























