Neelam Gorhe On Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं; नीलम गोऱ्हेंच्या विधानाने खळबळ, दानवे म्हणाले, ही नमकहरामी...
Neelam Gorhe On Uddhav Thackeray: नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Neelam Gorhe On Uddhav Thackeray नवी दिल्ली: 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena Thackeray Group) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या?
कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली.
नीलम गोऱ्हेंच्या विधानावर अंबादास दानवे काय म्हणाले?
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी आहे, असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलं. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं.
नीलम गोऱ्हे मातोश्रीवर कायम पडीक असायच्या; सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
नीलम गोऱ्हे आमच्या पक्षात खूप काळ राहिल्या आहेत. 30 वर्षे त्यांनी आमच्या पक्षात काम केलं. नीलम गोऱ्हे यांनी जे आरोप केलेत, त्यात काही तथ्य असेल, तर सर्वात जास्त कमाई नीलम गोऱ्हे यांनीच केली असावी. नीलम गोऱ्हे मातोश्रीवर कायम पडीक असायच्या, अशी ठाकरे गटाच्या नेत्या टीका सुषमा अंधारे यांनी केली. फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत आणि मातोश्रीवर कधी कोणी जावं, कोणाला भेटायला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचं, कोणाला पद द्यायचं नाही, प्रवेश सुद्धा, सगळं त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल. खरंतर, त्यांचा वार्षिक कमाईचा एवरेज किती आहे हा विचारायला पाहिजे होतं त्यांना असेही पुढे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.























