Sharad Pawar: साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा! कार्यकर्त्यांनी ते वाक्य उच्चारताच शरद पवारांचं स्मितहास्य
Maharashtra Politics: पुन्हा एकदा तेच घडलं, कार्यकर्ता शरद पवारांना म्हणाला साताऱ्यातून लढा अन्.... गेल्या काही दिवसांपासून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. आता नेमकं काय घडणार?
पुणे: लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात सध्या लोकसभा जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. अशावेळी शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे राज्याच्या विविध भागांमध्ये फिरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला जात आहे. शरद पवार यांनी अलीकडेच पुण्यात आलेल्या अनौपारिक गप्पांच्या कार्यक्रमात ही गोष्ट बोलून दाखवली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आता साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (Sharad Pawar Camp) पुन्हा हीच मागणी केली आहे. त्यावरील शरद पवारांचा प्रतिसाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
नेमकं काय घडलं?
शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध भागांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. बुधवारी याठिकाणी महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. त्यानंतर शरद पवार यांनी साताऱ्यातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा सातारच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, 'साहेब तुम्हीच साताऱ्यातून लढा'. त्यांच्या या वाक्यावर शरद पवार यांनी केवळ स्मितहास्य केले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात साताऱ्यात शरद पवार नेमका काय डाव टाकणार, याची चर्चा रंगली आहे. साताऱ्यातून भाजपचे नेते उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. गेल्यावेळी सातारा पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी पावसात केलेले भाषण विधानसभा निवडणुकीची दिशा बदलणारे ठरले होते. त्यामुळे यंदाही सातारा लोकसभेची लढाई रंगतदार होण्याची शक्यता आहे.
शरद पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार का?
शरद पवार यांनी फार पूर्वीच आपण यापुढे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, हे जाहीर केले होते. परंतु, पुण्यातील कार्यक्रमात त्यांनीच पत्रकारांना, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मला पुणे, सातारा किंवा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवा', असा आग्रह धरत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याचे टायमिंग चर्चेचा विषय ठरत आहे. शरद पवार यांना आपल्या एखाद्या वक्तव्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जाऊ शकतात, याची पुरेपूर जाण आहे. तरीही शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा आपल्याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरत असल्याचे सांगितले आहे. यामागे शरद पवार यांची कोणती खेळी आहे का? ते खरोखरच लोकसभेच्या रिंगणात उतरुन खळबळ उडवून देणार किंवा हा केवळ शरद पवार यांच्या रणनीतीचा भाग आहे, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा
शरद पवार सगळ्यात खतरनाक डाव टाकणार? पुणे,सातारा किंवा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?