शरद पवार गटाने ती एक गोष्ट केली असती तर कदाचित निकाल वेगळा असता; उज्ज्वल निकमांनी सांगितलं कारण
NCP Crisis: शरद पवार विरुद्ध अजित पवार गटाच्या विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निकाल देत घड्याळ हे चिन्हही त्यांना बहाल केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळाचे लक्ष हे अजितदादा गट Vs शरद पवार गटाच्या विधानसभाध्यक्षांसमोरील सुनावणीकडे लागले आहे. या सुनावणीत कोणत्या एका गटाचे आमदार अपात्र ठरणार किंवा शिवसेना पक्षाच्या निकालाप्रमाणे सर्वांना खुश करणारा निर्णय दिला जाणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जेष्ठ वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी भाष्य करताना काही निरीक्षणे आणि अंदाज नोंदवले आहेत. शरद पवार गटाने (Sharad Pawar Camp) निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात जाऊन निकालावर स्थगिती आणली असती तर आज कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळाले असते, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.
NCP Crisis: उज्ज्वल निकम काय म्हणाले?
शरद पवार गट आणि अजित पवार गटाने दहाव्या परिशिष्टानुसार एकमेकांच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारीला अजित पवार गट हा अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला होता. तसेच घड्याळ हे चिन्हही अजितदादा गटाला बहाल करण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या निकालाचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की, निकाल देताना आयोगाने तीन कसोट्या लावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचे उद्दिष्ट काय, पक्ष संघटना कोणाच्या ताब्यात आहे, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमत कोणाकडे आहे, अशा या तीन कसोट्या होत्या.
यापैकी पहिल्या दोन कसोट्यांबद्दल निवडणूक आयोगाने म्हटले की, एकमेकांच्या विरोधी गटाने ही उद्दिष्ट पार न पाडल्याचा कुठलाही पुरावा दिला नाही. त्यामुळे आम्ही पहिल्या कसोटीचा विचार करत नाही. दुसरी कसोटी राष्ट्रवादीची घटना होती. या घटनेचा भंग दोन्ही गटांनी केला आहे. त्यामुळे आम्ही या कसोटीचाही विचार करत नाही. मग निवडणूक आयोगाने तिसरी कसोटी पाहिली, कोणत्या गटाकडे जास्त आमदार आहेत? त्यामध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे जास्त आमदार अजितदादा पवार गटाकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह त्यांना बहाल केले. आता विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगाच्या या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करतात की अध्यक्ष त्यांच्या अधिपटलवार राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना पक्षाचा प्रतोद कोण होता, याचा विचार करतात. राष्ट्रवादीचा प्रतोद सध्या सरकारमध्ये मंत्री आहे. तेच आता अजित पवार गटाचे प्रतोद आहेत. त्यामुळे निकाल देताना विधानसभा अध्यक्षांची कसोटी लागेल, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.
शरद पवारांनी 'ती' एक गोष्ट केली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं: Ujjwal Nikam
शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देऊन स्थगिती घेतलेली नाही. शरद पवार गटाने निर्णयावर स्थगिती आणली असती तर आज कदाचित वेगळा लागला असता. निवडणूक आयोगाने म्हटले की, घटनेचा भंग दोन्ही गटांनी केला आहे. त्यामुळे घटनेचा विचार करणार नाही, हे निवडणूक आयोगाचे म्हणणे माझ्या मते अयोग्य आहे. पण शरद पवार गटाने त्याला आव्हान दिलेले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगाचा निकाल हाच आधार मानतील. आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी ज्याप्रकारे यापूर्वीच्या प्रकरणात 'सब खुश रहो' अशी भूमिका घेतली होती, तसंच होईल, अशी शंका मला असल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
आणखी वाचा
पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ आता राहुल नार्वेकर लावणार, संसदेच्या चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड