''इंडी आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील''; पंतप्रधान मोदींना 'गॅरंटी'
भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आठ दिवसांपूर्वी नायगाव परिसरामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली.
नांदेड - उत्तर प्रदेशनंतर देशातील सर्वाधिक लोकसभा (Loksabha) सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्रात यंदाच्याही निवडणुकांमध्ये भाजपाने विशेष लक्ष दिलं आहे. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती आहे. मात्र, महाराष्ट्रातून 45 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाने केला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सभांचाही धडाका राज्यात लागला असून रामटेक, वर्ध्यानंतर आता नांदेड आणि परभणीतही मोदींची सभा होत आहे. नांदेडमधील सभेत (Nanded) बोलतानाही मोदींनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज की जय. सर्वाना राम राम.. नांदेड आणि हिंगोली कराना माझा नमस्कार.. 26 तारखेची तयारी झाली आहे ना? असा प्रश्न विचारत मोदींनी स्थानिकता जपण्याचा प्रयत्न केला.एनडीए सरकारमुळे देशात विकास होत असल्याचं सांगताना इंडिया आघाडीवर (India Alliance) हल्लाबोल केला.
भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आठ दिवसांपूर्वी नायगाव परिसरामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली, यावेळी माजी मु्ख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या आठवणी जागवत नांदेडकरांशी स्थानिक नाळ जोडली. पहिल्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान झाला असून याच मतदानातून देशाचं भविष्य ठरतं, असे मोदींनी म्हटले. आपल्या भाषणातून पुन्हा एकदा मोदींनी काँग्रेस व इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. गरीब, शेतकरी, मजदूर आणि सर्वसामान्यांच्या विकासाच्या आड काँग्रेसकडून भींत टाकली जाते. आजही एनडीए सरकारकडून होत असलेल्या गरीबांच्या विकासकामांची खिल्ली उडवली जाते.
राहुल गांधींची सीट धोक्यात
राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटत आहे. 26 एप्रिलमध्ये जसं वायनाडमध्ये मतदान होईल. त्यानंतर, राहुल गांधींसाठी आणखी एका जागेची घोषणा करुन त्यांना तिथून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे मोदींनी म्हटले. तसेच, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दाखल देत काँग्रेस व इंडिया आघाडीला टोला लगावला. काँग्रेसचा परिवारच, या निवडणुकीत काँग्रेसला मत देणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण, जिथं ते राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही, अशी परिस्थिती काँग्रेसची कधी कुणी विचार केली होती का, असा सवालही मोदींनी विचारला. मित्रांनो, तुम्ही पाहा 4 जूननंतर इंडी आघाडी एकमेकांत लढत आहे. 4 जूननंतर हे सर्वजण एकमेकांचे कपडे फाडतील, एकमेकांचे केसं ओढतील, असा टोलाही मोदींनी नांदेडमधील सभेतून लगावला.
काँग्रसेने विकासाचा गळा घोटला
स्वातंत्र्यानंतर तब्बल 60 वर्षांनी कोट्यवधी गरीबांना शौचालय देण्याचं काम आम्ही केलं, त्यावरुनही काँग्रेसने खिल्ली उडवली. गरीब बँक खातं उघडून काय करणार, डिजिटल व्यवहार हा गरीब आणि अडाणी लोकांचं काम नाही, असे काँग्रेसमधील एक बडा नेता म्हणत होता. काँग्रेसवाल्यांना देशातील गरीबांवर विश्वास नाही. मग, तुम्ही काँग्रेसवर विश्वास ठेऊ शकता का?, असा सवाल मोदींनी विचारला. काँग्रेसने महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा गळा घोटण्याचं काम केलं आहे. काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी गरीब झाला, उद्योगवाढीला चालना मिळाली नाही, असे म्हणत काँग्रेस आघाडीवर मोदींनी टीका केली.
परभणीतही मोदींची सभा
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती.या सभेसाठी लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली, हजारो पोलिसांचा फौजफाटा नांदेडमध्ये तैनात होता. नांदेडमधील सभेनंतर मोदी परभणीमध्ये पोहोचणार असून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. परभणीच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.