Narayan Rane on Uddhav Thackeray : शिव्या घालणं, चांगल्या कामात व्यत्यय आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम, म्हणून पक्ष आवळत चाललाय; नारायण राणेंचा घणाघात
Narayan Rane on Uddhav Thackeray : माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता. साहेब गेले तेव्हा शिवसेना संपली, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

Narayan Rane on Uddhav Thackeray : वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहांनी (Amit Shah) जिन्नांना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, भाजपने हिंदुत्व सोडलं का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता यावरुन भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय. नारायण राणे म्हणाले की, आज रामनवमी आहे.सोबतच भाजपचा स्थापना दिवस पण आहे. त्या निमित्ताने मी दर्शनासाठी आलोय. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं काम सुरू आहे. विरोधकांकडे दुसरे काम राहिले नाही. देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे, असे त्यांनी म्हटले.
विरोधकांचा त्या कायद्याचा अभ्यास नाही
वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, विरोधकांचा त्या कायद्याचा अभ्यास नाही. त्यांनी ते वाचावे. कोणाच्या जाती धर्माविरोधात हे बिल नाही. वक्फच्या नावाने जो दुरुपयोग चालला होता तो थांबवावा आणि मुस्लिम समाजात जे गरीब लोक किंवा तलाक झालेल्या महिला आहेत, त्यांचं पुनर्वसन व्हावं, त्यांना शिक्षण मिळावं, हा समाज देखील प्रगत समाजाबरोबर जावा. त्यादृष्टीने वक्फ बिल आणले आणि ते मंजूर झाले आहे, असे त्यांनी म्हटले.
चांगल्या कामात व्यत्यय आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान केले. याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, चांगल्या दिवशी नको त्या माणसाच नाव घेत आहात. विकास, समृद्धी, लोकहित हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हेच उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष आवळत चाललाय. पुढच्या निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक, सामाजिक, विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी 39 वर्ष त्यांच्या सोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता. साहेब गेले तेव्हा शिवसेना संपली, असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत हा दुकान चालवतो
खासदार संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत हा दुकान चालवतो. सकाळी उठून मिडियाला बोलावतो. त्याचं कर्तुत्व सांगा. त्याचं देश, राज्य आणि गावासाठी काय योगदान आहे ते सांगावं. काही मदत करून विधायक काम करण्याचं काही आहे का? तुम्ही त्याच्या बातम्या देवू नये, असं मला वाटतं. संजय राऊतच्या कोणत्याही वक्तव्यावर मी बोलणार नाही. मुर्ख माणूस आहे, अस मी समजतो. त्याचं प्रत्येक वाक्य वाद निर्माण करणारं आहे. काही विधायक आहे का? देशहिताचं आहे का? समृद्धी किंवा देश सुखी समाधान व्हावे असले काही आहे का? अशा माणसावर बोलून मला वेळ वाया घालवायचा नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
आणखी वाचा
























