आमदार जितेश अंतापूरकर भाजपच्या गोटात? अशोक चव्हाणांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Nanded News: पक्षाने कारवाईचे संकेत दिल्यानंतर त्यांनी नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने अंतापूरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात आहे ..
Nanded News: नांदेड जिल्हयातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) हे आता भाजपच्या गोटात दिसून आलेत.. भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार अंतापुरकर यांनी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. आता या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे..
लोकसभा निवडणुकीत अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. शिवाय राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे . दरम्यान अंतापूरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात आहे ..
आमदारांवर कठोर कारवाईचे संकेत
विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला परभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता या आमदारांवर कठोर कारवाईची मागणी केली जातेय. ज्या आमदारांनी पक्षाचा आदेश डावलला त्या आमदारांच्या नावात आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. पक्षाने कारवाईचे संकेत दिल्यानंतर त्यांनी नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याची घटना महत्वाची ठरत आहे.
पक्षादेश डावलल्याच्या पार्श्वभूमीवर अंतापूरकरांची चव्हाणांशी भेट
जितेश अंतापूरकर हे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय समजले जातात. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अंतापूरकरही भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पक्षांतरबंदीच्या कायद्यामुळे काही नेत्यांनी भाजप प्रवेश टाळल्याचे सांगितले जात होते. रम्यान विधानपरिषद निवडणूकीत या आमदारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेला आदेश डावलल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगत पक्षाने या आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतलेल्या अशोक चव्हाणांच्या भेटीची चर्चा सुरु असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला
अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे (Mohanrao Hambarde) काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. येत्या आठवड्यात हे दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कारवाईऐवजी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती असून विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर विधानसभा निवडणुकीपर्यंत कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात उद्याच्या दिल्लीतील बैठकीत पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचे समजतेय.