MVA and MNS March : ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई.... 1 नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा, मनसेचं पहिलं पोस्टर, मोर्चा मार्गाबाबत अनिल परब म्हणाले...
महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मतदार यादीतील खोट्या मतदारांचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. या संदर्भातील मोर्चा 1 नोव्हेंबरला काढला जाणार आहे.

मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून 1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शेकाप, माकप, भाकप यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तर राज ठाकरे यांनी न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा, असे आदेश यांनी मनसैनिकांना दिले आहेत. या मोर्चाच्या तयारी संदर्भात शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेत अनिल परब यांनी मोर्चाचा मार्ग हा जवळपास ठरलेला आहे, अशी माहिती दिली. फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात होईल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर हा मोर्चा मुंबई महापालिकेसमोर येईल, असं अनिल परब म्हणाले. पुढचं नियोजन सुद्धा आता सध्या सुरू आहे. अधिकृतरित्या याची सगळी माहिती पत्रकार परिषदेमध्ये वरिष्ठ नेते देतील, असंही त्यांनी म्हटलं.
एक नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी आझाद मैदान परिसरात पाहणी केली. आमदार अनिल परब, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, खासदार अरविंद सावंत या नेत्यांनी एकत्रित पाहणी केली आहे. या पाहणीनंतर एकत्र बैठक झाली.
सत्याचा मोर्चा, मनसेचं पहिलं पोस्टर
1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित "सत्याचा मोर्चा" निघणार आहे. मनसेनं या संदर्भात एक ग्राफिक्स तयार केलं आहे. त्या पोस्टमध्ये दुपारी एक वाजता हिंदू जिमखाना मरीन लाईन्स येथे जमण्याचं आवाहन करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक ग्राफिक्स तयार केलं आहे. त्यामध्ये संविधान वाचवा, लोकशाही जगवा, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई आहे. ही खऱ्या मतदारांची लढाई आहे, खोट्या मतदारांची नाही. खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा !, असं आवाहन मनसेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान,सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने जमण्याचं महाविकास आघाडीतील पक्ष आणि मनसे पक्षाकडून आवाहन देखील करण्यात आलं आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट देखील घेतली.
























