मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; बीड, परभणीसह एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी,ठाकरेंना शायरीतून टोला
राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे म्हणतायत. परंतु, यांच्याकाळात गृहमंत्री अटकेत होता. साधू हत्याकांड देखील यांच्याच काळात झालं आणि ही मंडळी कायदा सुव्यवस्था विषयावर बोलत आहेत.
नागपूर : महायुती सरकारच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची आज सांगता होत असून अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषषद सभागृहात बोलताना चौफेर फटकेबाजी केली. बीड, परभणी, नक्षलवादाच्या मुद्द्यांसह विरोधकांनाही लक्ष्य केलं. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी शायरीतून ठाकरेंवर निशाणा साधला. तुफानों मे कश्तीया और घमंड मे बडी बडी हस्तीया डुब जाती है.. अशा शायराना अंदाजातून एकनाथ शिंदेंनी भाषणाला सुरुवात केली. तसेच, बीड, परभणीवरुन राज्यात उपस्थित झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन भाष्य केले. तसेच, मला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले, तर महाराष्ट्रात 2025 पर्यंत सगळा नक्षलवाद संपणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे म्हणतायत. परंतु, यांच्याकाळात गृहमंत्री अटकेत होता. साधू हत्याकांड देखील यांच्याच काळात झालं आणि ही मंडळी कायदा सुव्यवस्था विषयावर बोलत आहेत. महाविकास आघाडी काळात पोलीस यंत्रणेचा बेसुमार वापर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील खोट्या केसमधे अडकविण्याचा प्रयत्न झाला. त्यामधे काही मंत्री देखील यात होते. मला देखील अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला, पुरावा देखील आम्ही सादर केला आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा केला हे आपल्याला यावरून पहायला मिळालं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारमधील घडलेल्या घटनांवर भाष्य करत काही गौप्यस्फोटही केले. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलायचा नैतिक अधिकार यांना नाही. आरोप प्रत्यारोपामध्ये आपण गेलो आणि लोकांचे विषय बाजूला पडले.
मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले
बीड परभणी प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही. मी महाविकास आघाडीत होतो, तिथ मला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमधे टाकण्याचा प्लॅन सुरू होता, अंबादास आपल्याला माहिती आहे, किती त्रास झाला ते असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदेंनी सभागृहात केला. राज्याचे विधानसभेचे अवर म्हंजे काही गप्पा मारण्याचे ठिकाण नाही. बदलापूर घटनेचा विषय निघाला, त्यावेळी काहींजणांनी रेल्वे ट्रॅकवर जाऊन रेल्वे अडवली. आम्ही आरोपीला फाशी देतो म्हटले. मात्र, पोलिसांनी ज्यावेळी आरोपीचा एन्काऊंटर केला तेव्हा आरोपीच्या बाजूने हे लोक राहिले, असा टोला विरोधकांना लगावला.
2 लाख 13 हजार रोजगार निर्मित्ती
मागच्या अधिवेशनात श्वेत पत्रिका उद्योग विभागाची काढली होती. आमच्याकडे हिम्मत होती म्हणून निर्णय घेतला. 2 लाख 13 हजार रोजगार निर्मिती राज्यात होणार आहे. राज्यात 2 लाख 43 हजार कोटीची गुंतवणूक राज्यात अली आहे. सव्वा लाख लोकांना संधी मिळाली आहे.
2025 पर्यंत नक्षलवाद संपणार
मला नक्षलवाद्यांची धमकी अली होती, मात्र मी डेव्हलपचा मुद्दा समोर ठेऊन काम करत आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक घेतली होती. आपल्या इकडचे नक्षलवादी छत्तीसगढला पळून जायचे आणि जंगलात लपून रहाचे. कारण, काँग्रेस सरकार त्यांना लपायला मदत करत होते. मात्र, आता तिकडचे सरकार बदलले आहे. त्यामुळे, 2025 पर्यंत महाराष्ट्रातील सगळा नक्षलवाद संपून जाणार आहे , असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
औषध खरेदीतील दोषींवर कारवाई करू
अगोदरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र विकासाच्या मुद्द्यावर तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. मात्र आता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. औषध खरेदीबाबत आरोप करण्यात आले, दोषींवर आम्ही योग्य कारवाई करू, असेही शिंदेनी म्हटले
हेही वाचा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 6 दिवसांत काय झालं?; बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं