(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! राहुल गांधींच्या जाहीर सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांचा आक्षेप; वाहतूक कोंडी होण्याचा दावा !
येत्या 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील बीकेसीत राहुल गांधी यांची सभा होणार आहे. पण मुंबई वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसच्या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई : मुंबईतील बीकेसीमध्ये येत्या 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा होणार आहे. मात्र या सभेला मुंबई वाहतूक पोलिसांचा (Mumbai Traffic Police) आक्षेप आहे. हा आक्षेप मुंबई वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे पाठवला आहे. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेमुळे आत काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.
20 ऑगस्टला राहुल गांधींची सभा
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे खासदार राहुल गांधी यांची एक सभा होणार आहे. पण या सभेला मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे..बीकेसीमध्ये 20 ऑगस्ट रोजीच्या या सभेवरील आक्षेप वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे पाठवला आहे. वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएला सांगितले आहे की, सायन रेल्वे स्थानकावरील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बंद झाल्यामुळे (नवीन पूल बांधण्यासाठी हा पूल पाडला जात आहे) संपूर्ण वाहतूक बीकेसीमधून जात असून बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यात राहुल गांधी यांच्या सभेचा या वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
मुंबई वाहतूक पोलिसांचं नेमकं म्हणणं काय?
बीकेसी परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे पूर्वीपेक्षा रस्त्याची रंदी कमी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या सभेला किमान 20 हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सायन आरओबी बंद झाल्यापासून बीकेसीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची सभा किंवा रॅली आयोजित करण्यात आलेली नाही, असे मुंबई वाहतूक पोलिसांचे मत आहे. पोलिसांच्या या भूमिकेबाबत एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "एमएमआरडीए कोणत्याही राजकीय रॅलीसाठी परवानगी देत नाही. एमएमआरडीए केवळ त्यांचे भूखंड भाड्याने देते. कोणत्याही रॅलीसाठी किंवा सभेसाठी आयोजकांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. या एजन्सीजने आवश्यक परवानगी न दिल्यास एमएमआरडीए कोणत्याही रॅली किंवा सभेसाठी भूखंड देऊ शकत नाही."
काँग्रेस काय भूमिका घेणार?
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या सभेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून तयारी केली जात आहे. पण मुंबई वाहतूक पोलिसांनी या सभेवर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेमुळे आता राहुल गांधींची बीकेसीत सभा होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा :
ठाकरेंची खेळी अन् काँग्रेस, राष्ट्रवादीची मात्र गुपचिळी; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला बगल