(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला तीन मोठे गिफ्ट, पुणे आणि ठाणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी; जाणून घ्या राज्याला नेमंक काय मिळालं?
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचे राज्य सरकारकडून स्वागत करण्यात आले आहे.
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पुणे मेट्रो, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच आता या प्रकल्पांचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयांचे राज्य सरकारने स्वागत केले आहे.
केंद्र सरकारने नेमके काय निर्णय घेतले?
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्यासाठी एकूण तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात वाढवण बंदराचाही समावेश आहे. केंद्राने वाढवण बंदरासाठी 76 हजार 200 कोटीचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर केले आहेत. तसेच पुण्यातील मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या विस्तारालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमी लांबीच्या विस्तारास ही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2,954.53 कोटी रुपये लागणार असून तो 2029 सालापर्यंत पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
जवळपास ₹12,200 कोटी खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत इत्यादी प्रमुख भागांना जोडण्यात येणार आहे. ठाणे इंटग्रिल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प हा एकूण 29 किमी लांब असेल. यामध्ये एलिव्हेटेड मार्ग 26 किमी तर 3 किमी अंडरग्राऊंड मार्ग असेल. या मेट्रो प्रकल्पात एकूण 22 थांबे असतील.यात दोन थांबे हे अंडरग्राऊंड तर 20 थांबे हे एलिव्हेटेड असतील.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळावी, निधी उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पाठपुरावा केला होता. या मेट्रो रेल्वे सेवेला दिलेल्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शहरे विकास मंत्री मनोहरलाल खट्टर, तत्कालीन केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे आभार मानले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी पुणे आणि ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमुळे केंद्राचे आभार मानले आहेत.
हेही वाचा :