काल आई म्हणाली मुलगा अमोलच जिंकणार; आज गजानन किर्तीकर म्हणाले, टर्निंग पॉईंटला लेकासोबत नव्हतो, पण...
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या लेकासाठी प्रचार करत होते. पण, उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार आपल्या लेकाविरुद्ध प्रचाराच्या मैदानात होते
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील 6 मतदारसंघात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झालं. या मतदारसंघातील निवडणुकांकडे यंदा राज्याचे लक्ष लागले होते. कारण, शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच सर्वात मोठी निवडणूक होती. त्यामुळे, मुंबईतील मदारसंघात केवळ ठाकरे विरुद्ध भाजपा असाच सामना नव्हता. तर, ठाकरे विरुद्ध, शिंदे आणि भाजपा असा सामना रंगला होता. त्यामुळे, ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली ही निवडणूक आहे. त्यातत, येथील दोन मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना रंगला आहे. यंदा केवळ शिवसेना कार्यकर्तेच एकमेकांविरद्ध मैदानात उतरले नव्हते. तर, कुटुंबातही दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. त्यातूनच, उत्तर-पश्चिम मुंबई (Mumbai) मतदारसंघात लेक उमेदवार असातना बाप विरोधात प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, लेकासाठी प्रचार न केल्याची खंत अखेर वडिल गजानन कीर्तीकर (Gajanan kirtikar) व्यक्त केली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या लेकासाठी प्रचार करत होते. पण, उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार आपल्या लेकाविरुद्ध प्रचाराच्या मैदानात होते. त्यामुळे, अमोल किर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर ही लढत लक्षवेधी आणि चर्चेत ठरली आहे. वडिल गजानन किर्तीकर हे जरी मुलगा अमोलच्या विरोधात राजकीय भूमिका घेत मैदानात उतरले होते. तरी, अमोल किर्तीकरांची आई व गजानन यांच्या पत्नी मेघना कीर्तीकर लेकाच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या होत्या. विशेष म्हणजे कालच त्यांनी याबाबतची भूमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. त्यानंतर, आज गजानन कीर्तीकरांनीही खंत व्यक्त केली आहे.
टर्निंग पाँईटला मुलासोबत नसल्याची खंत
लोकसभेची ही निवडणूक अटीतटीची आहे, कारण दोन पक्ष फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. खासदार निवडून येतील, मात्र यामध्ये खरा कोण हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. लोकांचं जनमत कोणाच्या बाजूने हे निवडणुकीतून दिसेल, असे गजानन कीर्तीकर यांनी म्हटले. दीड-दोन वर्षांपूर्वी मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते, पण मी वेगळं मत मांडलं आणि एकटा पडलो. आज मुलासोबत टर्निंग पॉईंटला मी सोबत नव्हतो, याची खंत वाटते, असे म्हणत गजानन कीर्तीकरांनी मनातील खंत बोलून दाखवत पुत्रप्रेमाचा दाखला दिला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माझा फायदा खरं म्हणजे रवींद्र वायकरला मिळाला पाहिजे. मी या निवडणुकीत अमोल किंवा रवींद्र वायकर यांच्या विरोधात भूमिका मांडली नाही, असेही कीर्तीकरांनी म्हटले.
महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील
अमोल त्याची संघटना सोडून कुठेच जाणार नाही, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि मी वन टू वन भेटून देखील अमोलला सांगितलं होतं. पण, तो शिवसेनेत आमच्यासोबत आला नाही, असा गौप्यस्फोटही कीर्तीकरांनी केला. तसेच, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवार दिलेले आहेत, ते लढत आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीला देखील महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा दावाच कीर्तीकर यांनी केला आहे. कीर्तीकरांच्या या विधानामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावताना दिसून येतात.
आई लेकाच्याच पाठिशी
माझा पाठिंबा अमोलला आहे. गजानन कीर्तिकरांची भूमिका आणि विचार वेगळा आहे. गजानन कीर्तिकरांनी वेगळी भूमिका घेतल्याचं मला आवडलं नाही. हे काही बरोबर केलं नाही असं त्यावेळी मी त्यांना बोललेदेखील. आपण हातचं काही ठेवत नाही. जे पटत नाही ते सांगायला काय भीती, असे मेघना कीर्तीकर यांनी म्हटले आहे. हे राजकारण आहे, त्यामुळे प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. हा शिंदे आमच्याकडे कितीदा येत होतो, गजानन कीर्तिकरांपेक्षा तो किती लहान आहे. आज त्याला तुम्ही सलाम ठोकणार हे काही बरोबर वाटत नाही. ज्यांनी त्यांनी आपल्याला परवडेल ते करावं, अशा शब्दात त्यांनी परखडपणे भूमिका मांडली होती.