कार नाहीच, 16 तोळे सोने, 92 लाखांची संपत्ती; राम सातपुतेंच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय काय?
राम सातपुतेंची संपत्ती नेमकी किती? याची माहिती संपत्ती विवरण पत्रातून समोर आली आहे.
सोलापूर - माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने कायम चर्चेत राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत. प्रणिती शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपानेही टीम देवेंद्र यांच्या मर्जीतील युवा उमेदवार मैदानात उतरवला आहे. आमदार राम सातपुते यांना भाजपाने सोलापूर महायुती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. दोन युवक नेते आमने-सामने आल्याने ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सोलापुरात सुरू आहे. मी ऊसतोड कामगाराचा मुलगा असल्याचं राम सातपुते प्रचारात आवर्जुन सांगत आहेत. त्यावरुन, विरोधकांकडूनही त्यांच्या घराचे फोटो शेअर करत त्यांना ट्रोल केलं जात आहे. आता, सातपुते यांच्या संपत्तीची अधिकृत माहिती पुढे आली आहे.
सोलापूरात उन्हाचं कडक तापमान असताना राजकीय वातावरण तापलं आहे. गुढी पाडव्यादिवशी शोभायात्रेत दोन्ही उमेदवार आमने-सामने आले होते, तेव्हा भाजपा समर्थकांनी प्रणिती शिंदेंना पाहून जय श्रीराम अशी घोषणाबाजी केली. तर काँग्रेस समर्थकांनीही प्रणिती शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. या दोन्ही नेत्यांच्या राजकीय प्रचारात घराणेशाही आणि सर्वसामान्य कुटुंब हा मुद्दा सध्या प्रमुख बनला आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असे म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंची संपत्ती नेमकी किती? याची माहिती संपत्ती विवरण पत्रातून समोर आली आहे. त्यानुसार, आमदार राम सातपुते लक्षाधीश असून करोडपती बनण्याच्या अगदी जवळ आहेत.
सातपुतेंची एकूण मालमत्ता
आमदार राम सातपुते यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी, त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती आयोगाला दिलेल्या विवरणपत्रातून दिली होती. आता, लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी सोमवारी अर्ज दाखल केला.त्यानुसार, राम सातपुतेंकडे 92 लाखांची संपत्ती असून जंगम व स्थावर अशा दोन्ही संपत्तीचा समावेश आहे. सातपुते कुटुंबाकडे 16 तोळे सोनं असून एक बुलेट्सह तीन दुचाकी गाड्या आहेत.राम सातपुते यांची जंगम मालमत्ता 13 लाख 13 हजार आहे. तर, त्यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 24 लाख 30 हजार एवढी आहे. सातपुते यांच्याकडे मांडवे गावात 14 लाख रुपयांची शेती व 41 लाखांचे घर आहे.
2019 किती होती संपत्ती
राम सातपुते यांची 2019 सालच्या नामनिर्देशन अर्जानुसारची जंगम मालमत्ता 5 लाक 25 हजार होती. तर, त्यांच्या पत्नीकडे 5 लाख 9 हजार रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्यानुसार, गेल्या 4 ते 5 वर्षात राम यांच्या संपत्तीत ८ लाखांची वाढ झाली असून त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 19 लाख रुपयांची वाढ झाली आहे. राम सातपुते यांचा शेती तर, त्यांच्या पत्नीचा किराणा व भुसार मालाचे दुकान असल्याचा व्यवसाय आहे.
गरिबीवरुन काँग्रेस समर्थकांचा सवाल
दरम्यान, सोलापुरात राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे ह्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या असून मी ऊसतोड कामगाराचा मुलगा असल्याचे म्हटले होते. तसेच, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असे म्हणत प्रणिती शिंदेंवर टीकाही केली होती. त्यानंतर, काँग्रेस समर्थकांनी त्यांच्या बंगल्याचे फोटो शेअर केले, तसेच त्यांच्या विवाह सोहळ्यातील खर्चावरुनही प्रश्न उपस्थित केले होते. ऊसतोड कामगाराचा मुलगा पाच वर्षात श्रीमंत कसा झाला, असा सवालही काँग्रेस समर्थकांनी उपस्थित केला होता.