महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यासाठी एमआयएम पैसे घेऊन भाजपला मदत करते; रोहित पवारांचा गंभीर आरोप
Rohit Pawar : रोहित पवार यांच्याकडून संघर्ष यात्रा काढण्यात आली असून, यावेळी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहे.
नागपूर : एमआयएम (MIM) पक्ष हा भाजपकडून (BJP) पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एमआयएमवर केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला आहे. त्यातच आता रोहित पवार यांनी थेट आरोप केल्याने यावरून राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांच्याकडून संघर्ष यात्रा काढण्यात आली असून, यावेळी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहे.
दरम्यान, याचवेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्याची भाषा करतात, 2019 मध्ये त्यांनी उमेदवार उभे केल्याने आमचे अनेक उमेदवार पडले. आमचा पण संविधान वाचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी खबरदारी घ्यावी असा सल्ला रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.
'त्या' पत्राचा सत्तास्थापनेसाठी दुरुपयोग...
अजित पवार यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या. मात्र, त्या पत्रात नेमकं काय लिहले आहे, याबाबत कोणीही विचारणा केली नव्हती. त्यामुळे तेच पत्र चोरून सत्तास्थापने त्या पत्राचा अजित पवार गटाने दुरुपयोग केल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केला. आज रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा नागपूरला पोहचली आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई का होत नाही?
दरम्यान, याचवेळी बोलतांना रोहित पवार यांनी नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवरून अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील टीका केली आहे. नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात येते, मात्र त्याचवेळी प्रफुल्ल पटेल यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही. पटेल यांच्यावर देखील गंभीर आरोप आहेत. मात्र, पटेल यांनी अजित पवारांना भाजपसोबत एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.
युवा संघर्ष यात्रा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार
रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेने सुमारे 775 कि.मी.चं अंतर पार केलं असून, ही यात्रा शनिवारी नागपूरच्या वेशीवर जाऊन धडकली. यादरम्यान पेठ काळडोंगरी (जि. नागपूर) इथं सभा घेण्यात आली. यावेळी रोहित पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला. तर, ही युवा संघर्ष यात्रा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर जाऊन धडकणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यावेळी शरद पवारांची देखील सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
बीडमध्ये ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्यासाठी प्रोफेशनल गुंडांचा वापर, रोहित पवारांचा गंभीर आरोप