(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपाला का मतदान करावं, तुम्ही आम्हाला कारणे सांगा, असे म्हणत येथील मराठा समाज आक्रमक झाला होता.
लातूर - राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 13 टक्के आरक्षण देऊ केले. मात्र, आपणास ओबीसीमधून आरक्षण हवे असल्याची मागणी करत मराठा समाज अद्यापही आक्रमक आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकटवला असून मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐन निवडणुकीतही समोर येत आहेत. त्यातच, मराठवाड्यातील बीड जिल्हा सध्या मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) केंद्रबिंदू बनले आहे. तर, नांदेड जिल्ह्यातही मराठा समाजा नेत्यांच्या सभास्थळी थेट प्रश्न विचारत आहे. यापूर्वी, भाजपा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या सभेत नांदेड जिल्ह्यातील जांब गावात मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारले होते. आता, भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.
भाजपाला का मतदान करावं, तुम्ही आम्हाला कारणे सांगा, असे म्हणत येथील मराठा समाज आक्रमक झाला होता. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना अडवून समाज बांधवांनी प्रश्नांची सरबत्ती केली. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार मग आरक्षणात देण्यास अडचण का?, आपले खासदार भाजपाचे आहेत मग त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही? अंतरवली सराटीमध्ये झालेल्या अमानुष मारहाणी बद्दल तुम्ही गप्प का? असे प्रश्न करत मराठा समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी भाजपा आमदाराचा ताफा अडवला. लातूर जिल्ह्यातील धनेगाव येथील घटनेचा व्हिडिओ समोर आला असून मराठा समाजाकडूनही या व्हिडिओचे समर्थन केले जात आहे.
देवणी तालुक्यातील धनेगावची घटना
भाजापने काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपल्या पक्षात घेतले. त्यानंतर, त्यांना राज्यसभेचे खासदारही केले. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठावाड्यातून जास्तीत जास्त जागा निवडून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. मात्र, त्यांनाही मराठा समाजाच्या रोषाला समारे जावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर हेही प्रचारासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये सभा घेत आहेत. काही ठिकाणी कॉर्नर बैठका आणि मीटिंग सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात असणाऱ्या धनेगाव येथे ते काल रात्री गेले होते. भाजपाचे लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शिंगारे यांच्या प्रचारासाठी तिथे बैठक लावली होती. या बैठकीसाठी संभाजी पाटील निलंगेकर येणार असल्याची माहिती कळल्यानंतर गावातील तरुणांनी एकत्रित येत त्यांना विरोध केला.
बैठकीनंतर आमदारांचा काढता पाय
संभाजी पाटील निलंगेकर गावात दाखल झाल्यानंतर मराठा समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा देत विरोध दर्शवला. मराठा समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी आमदार महोदयांना अनेक प्रश्न केले. भाजपाला आम्ही का मतदान करावे हे तुम्ही सांगा, आणि का करू नये ते आम्ही सांगतो असा थेट सवालच आक्रमक मराठा युवकांनी केला होता. दरम्यान, आ. संभाजी पाटलांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणांचा आक्रमक बाणा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर संभाजी पाटलांनी तिथून काढता पाय घेतला.