पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही, आम्ही लढून आरक्षण मिळवणार; जरांगे स्पष्टचं बोलले
Maratha Reservation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा उरलेली नाही, मराठ्यांनी सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असे जरांगे म्हणाले.
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही, मराठ्यांनी सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असे जरांगे म्हणाले. तर, पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही, आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही, मराठ्यांनी देखील त्यांची अपेक्षा सोडून द्यावी. त्यांचा महाराष्ट्रात येण्याचा आम्हाला काय फायदा आहे. तुम्ही सामान्यांचे नेतृत्व केलेला आहे, तुम्ही राज्य सरकारला आदेश देऊन टाका हे आम्ही त्यांना शिर्डीच्या दौऱ्यावर असतानाच आवाहन केले होते. जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही, ज्याला सामान्यांची गरज राहिलेली नाही, त्यांच्याकडून अशा अपेक्षा करण्याची काय गरज आहे. आम्ही लढून आरक्षण मिळवतो, हात पसरवण्याची गरज नाही. एकदा आम्ही त्यांना विनंती केली होती. राज्यात एवढं वातावरण ढवळून निघाले असतांना पंतप्रधानांनी त्यात हस्तक्षेप करणं गरजेचं होतं. पंतप्रधानांनी आरक्षण देऊन टाका एवढ शब्द काढणे अपेक्षित होतं. मात्र, आता त्यांच्याकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडली आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात येऊ की कुठेही येऊ, मराठ्यांनी त्यांची अपेक्षा सोडावी, असेही जरांगे म्हणाले आहेत.
मराठा आंदोलकांना आवाहन....
मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आज पुन्हा मराठा आंदोलकांना काही सूचना दिल्या आहेत. "मुंबई दौऱ्यात जाताना रस्त्यावरती आंदोलकांनी ठिकठिकाणी पाण्याचे, जेवणाचे स्टॉल लावावेत, जेणेकरून आंदोलकांची जेवणाची व्यवस्था होईल. अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी सर्व मतभेद विसरून एकत्र यायला पाहिजे. सर्वच जिल्ह्यातील मराठा बांधवांनी आपापल्या हद्दीतून गाड्या घेऊन सहभागी व्हावेत. ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे, त्यांनी वीस तारखेला स्वतःहून अंतरवलीत यावेत. दौरा कमी वेळचा असल्याने,लोकांचे काम बुडणार आहे. आमची मूळ मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, नोंदी मिळालेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र तात्काळ मिळावे अशी आहे. आम्ही 20 जानेवारीला मुंबईला निघणार असल्याचा निर्णय अंतिम आहे. आरक्षण मिळाले तर आम्ही गुलाल घेऊन मुंबईला जाणार आणि नाही मिळाला तर आरक्षण घेण्यासाठी मुंबईला जाणार असे जरांगे म्हणाले आहेत.
षडयंत्र रचले जात आहे
आम्ही 20 जानेवारीला मुंबईला निघणारच, आम्हाला मुंबईला जाण्याची कोणतेही हौस नाही. मुंबईमध्ये सुद्धा आमचेच बांधव असून, त्यांनी होणार त्रास काही दिवस सहन करावा. विनाकारण मुंबईला त्रास देण्याचं काम सरकारच करत आहे. हे सर्व सरकार हाताने मुद्दाम करत आहे. सरकारमधील काही लोकांचा विरोध असून, ते अंधारातून विरोध करत आहेत. त्यांची नावे देखील जाहीर करणार आहोत. त्यामुळे, समाजाच्या विरोधात जाऊन पापाचे धनी होऊ नका. यांना गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाहीत. त्यामुळे षडयंत्र रचले जात आहे. धोका झाला तरी भीतोय कोण?, नोटीसा देऊन काही होणार नाही, असे जरांगे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: