Nana Patole: तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या व्यावसायिक राजकारण्यांचं पोट कुठेच भरत नाही; नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांना टोला
Majha Maharashtra Majha Vision: नाना पटोले यांनी 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले. नाना पटोले कोणालाही मॅचफिक्सिंग करुन देत नाही. पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणे माझे दायित्त्व आहे.
मुंबई: राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे ते पक्षासाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता काम करत राहतात. मग ते बाकी कुठल्याही गोष्टीकडे बघत नाहीत. तर दुसऱ्या प्रकारचे लोक हे व्यावसायिक राजकारणी असतात. त्यांचे पोट कुठेही गेले तरी भरत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना टोला लगावला. ते सोमवारी मुंबईत एबीपी माझा आयोजित 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी नाना पटोले यांना त्यांच्याविषयी काँग्रेस पक्षात असलेल्या नाराजीविषयी विचारणा करण्यात आली. अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी, झिशान सिद्दीकी हे नेते तुमच्याविषयी नाराजी बोलून दाखवतात, याकडे पटोलेंचे लक्ष वेधण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला देण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा उल्लेख केला. काही लोक पक्षाच्या पदावर बसून चुकीचं काम करत असतील तर त्यांना तशाच भाषेत उत्तर दिले पाहिजे. नाना पटोले कोणालाही मॅचफिक्सिंग करुन देत नाही. पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणे माझे दायित्त्व आहे. हे कोणाला खटकत असेल तर त्याला मी काही करु शकत नाही. त्यामुळे ज्यांना पक्षासोबत राहायला जमतंय त्यांनी राहावे. नाहीतर दुसरीकडे त्यांना 100-150 कोटी मिळत आहेत, असे नाना पटोले यांनी म्हटले.
काँग्रेसच्या नाराज नेत्यांबाबत मी काहीही करु शकत नाही: नाना पटोले
काँग्रेसमधील अनेक नेते तुमच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. तरीही हायकमांडचा अजूनही तुमच्यावर विश्वास कसा, असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. याविषयी बोलताना पटोले यांनी म्हटले की, पक्षाला सत्तेत आणणे चूक असेल तर ती चूक मी नेहमी करेन. माझ्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्षाने कसबा, अमरावती आणि नागपूरमध्ये निवडणूक जिंकली. यानंतर काहीजणांना त्रास होत असेल तर मी काही करु शकत नाही. माझा कुठलाही दोष नाही म्हणून हायकमांड माझ्यावर कारवाई करत नाही. मी व्यावसायिक म्हणून राजकारणात आलेलो नाही. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला अधिकारापदावर काम करताना संघर्ष हा करावाच लागतो,असे नाना पटोले यांनी म्हटले.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'ला राजकीय नेत्यांची मांदियाळी
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधण्यात आला. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.
आणखी वाचा
आशिष शेलारांना भाजपमध्ये कोणीही विचारत नाही, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते: आदित्य ठाकरे