महायुतीत सर्वांनी समान जागा लढवाव्या, मिटतच नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती व्हाव्या, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
महायुतीत जिथं मिटतच नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत, असं मोठं वक्तव्य, माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केलं आहे.
Arjun Khotkar : काही ठिकाणीच्या जागांवर महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्ष आग्रही आहेत. त्यामुळं जिथं मिटतच नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत, असं मोठं वक्तव्य, माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केलं आहे. आपलेच कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला जाऊ द्यायचे नसतील तर मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत. महायुतीमध्ये सर्वांनी समसमान जागा लढल्या पाहिजेत. आमच्या वाट्याला जास्त जागा आल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह असल्याचे खोतकर म्हणाले.
एकट्याच्या बळावर सरकार आणणे ही आता इतिहासजमा झालंय
सर्वच ठिकाणी एकमत होईल असं शक्य नाही. अनेक जागांवरती तिन्ही पक्ष ओढातान करतील असेही अर्जुन खोतकर म्हणाले. आशा ठिकाणी विकोपाला न जाता मैत्रीपूर्ण लढती केल्या पाहिजेत असे खोतकर म्हणाले. एकमेकांच्या ताकती शिवाय कोणीच पुढे जाऊ शकणार नाही. एकट्याच्या बळावर सरकार आणणे ही आता इतिहास जमा गोष्ट झाली असल्याचं खोतकर म्हणाले. सरकार आणायचं असेल तर तिघांना समन्वयानेच पुढे जावे लागेल असं खोतकर म्हणाले.
लाडकी बहीण योजनेत सर्वात जास्त योगदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे
लाडकी बहीण योजनेबाबतही खोतकर यांनी प्रतिक्रिया दिला. लाडकी बहीण योजनेत सर्वात जास्त काकणभर का होईना योगदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असल्याचे खोतकर म्हणाले. या योजनेला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या योजनेच्या श्रेयवादाची लढाई महायुतीत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमांतून राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन महिला भगिनींना साद घातली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही आपल्या प्रत्येक भाषणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांचं योजनेकडे लक्ष वेध आहेत. मात्र, दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही श्रेयवादाचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. आता, अशातच माजी आमदार अर्जून खोतकर यांनी या योजनेत जास्त योगदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं असल्याचा दावा केला आहे. त्यावरुन, महायुतीत पुन्हा खटका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीत खोतकर यांच्या विधानावरुन कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान, आधीच बारामतीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बॅनर काळ्या पडद्याने झाकल्यामुळे महायुतीतील या दोन पक्षात वाद होताना पाहायला मिळते.
महत्वाच्या बातम्या:
Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग