(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shinde Group On Sanjay Raut : 'संजय राऊतांच्या धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं', शिंदे गटाने निवडणूक आयोगात सादर केलेल्या लेखी उत्तरात दावा
Shinde Group on Sanjay Raut : संजय राऊत यांच्या धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगात दाखल केलेल्या लेखी उत्तरात केला आहे.
Shinde Group on Sanjay Raut : "संजय राऊत यांच्या धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं," असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगात दाखल केलेल्या लेखी उत्तरात केला आहे. "आमदार महाराष्ट्रात परतले तर फिरणे कठीण होईल," संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्याचा दाखला शिंदे गटाच्या (Shinde Group) लेखी उत्तरात देण्यात आला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगात (Election Commission) निकाल देणार आहे. निवडणूक आयोगाने 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या लेखी उत्तरात शिंदे गटाने संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे.
याआधी सुप्रीम कोर्टातही संजय राऊतांच्या वक्तव्याचा दाखला
आम्ही पक्षातच आहोत पण आम्हाला हे पाऊल का उचलावं लागलं याचं कारण देताना शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. आमदारांनी 20 जून रोजी बंड केलं आणि सूरतला निघून गेले. ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, असं ठाकरे गटाने म्हटलं. ठाकरे गटाच्या या दाव्याला प्रतिदावा म्हणून शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा दाखला देण्यात आला. याआधी जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टात सुद्धा शिंदे गटाने हाच दावा केला होता. त्याचं लेखी उत्तर काल शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सुप्रीम कोर्टाने तोंडी निर्देश दिले होते की अशाप्रकारच्या वक्तव्यांपासून त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे.
त्यावेळी संजय राऊत यांचं हे वक्तव्य बंडखोर आमदारांसाठी इशारा समजलं जात होतं. आता या वक्तव्याचा कायदेशीर वापर शिंदे गट करु पाहत आहे. एका पक्षात दोन गट भांडत असतात किंवा पक्षात उभी फूट पडते तेव्हाच निवडणूक आयोग निर्णय देत असतं. एखादा गट सोडून गेला तर त्यांना चिन्हावर दावा करता येत नाही.
हे शिंदे गटाचे वैफल्य, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
शिंदे गटाने उल्लेख केलेलं भाषण हे बंडखोर आमदार सूरतहून गुवाहाटीला गेले तेव्हाचं आहे. दहिसरमध्ये हे भाषण केलं आहे. आल्यावर यांना दंडूक्याने बडवा, पार्श्वभाग सूजवून काढा, असं त्यांच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर केलं होतं. त्यानंतर त्या गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामीन झाल्या. शिंदे गटाचे नेते प्रत्येक वेळी भूमिका बदलतात, त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. हे त्यांचं वैफल्य आहे. निवडणूक आयोग असो वा सर्वोच्च न्यायालय, प्रत्येक लढाई ते हरणार, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.