मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात; शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Shirsat : शिरसाट यांच्या गौप्यस्फोटनंतर राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.
Sanjay Shirsat On Ambadas Danve : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या पक्षात असणारा नेता उद्या दुसऱ्या पक्षात गेल्याची बातमी समोर येत आहे. आता अशाच परिस्थितीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) माझ्या संपर्कात असून, कधीही काही होऊ शकतं असे वक्तव्य शिरसाट यांनी केला आहे. तर ठाकरे गटात आलेल्या सुषमा अंधारे डोक्याच्यावर झाले असल्याचं म्हणत दानवे यांनी आपल्याला फोन करून नाराजी व्यक्त केली असल्याचा दावा देखील शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या गौप्यस्फोटनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर अनेक आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली असून, अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. तर आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. मात्र ते आमदार कोण याबाबत नावं सांगितले जात नव्हते. मात्र पहिल्यांदाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उघडपणे अंबादास दानवे यांचे नाव घेऊन, ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे अंबादास दानवे यांनी आपल्यासोबत फोनवरून चर्चा केली असल्याचा देखील दावा शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे आता शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटावर अंबादास दानवे काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
आता हिंदुत्ववावर कसे बोलणार...
वातावरण कुठे चालले हे आम्ही सभागृहात पाहत असतो. ज्यावेळी सभागृहात कोणताही विषय निघतो, त्यावेळी ठाकरे गटात जे काही 14-15 उरले आहेत त्यातीलअर्धे येतच नाही. जे येतात ते कधीच काही बोलत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली यांची शिवसेना आज कुठे आहेत. आज मालेगावात यांची सभा होत असून, या सभेची जाहिरात पाहा.'जनाबे अली उद्धव बाळासाहेब ठाकरे आ रहे है' असे सर्व उर्दूमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता हिंदुत्ववावर कसे बोलणार असा प्रश्न त्यांच्यासोमर निश्चित आला असेल, असे शिरसाट म्हणाले.
अन् दानवे यांना मातोश्रीवर फोन आला...
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, तुम्ही हे समजू नका, राजकारणात कधीही काहीही घडत असते. अंबादास दानवे यांनी एकदा मला फोन केला. तसेच सुषमा अंधारे डोक्याच्यावर झाल्या असल्याचे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या सभेसाठी आलेल्या सुषमा अंधारे यांना सुभेदारी शासकीय विश्रामगृहात थांबवले असताना, त्यांनी थेट मातोश्रीवर फोन करून वहिनींकडे तक्रार केली. त्यामुळे लगेच दानवे यांना मातोश्रीवरून फोन आला आणि अर्ध्यातासात अंधारे यांची व्यवस्था रामा हॉटेलमध्ये करण्यात आली, असल्याचं शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार 'धनुष्यबाण यात्रा'; छ. संभाजीनगरमधून सुरुवात