Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
Shivsena Cabinet Ministers list: एकनाथ शिंदे यांच्याकडून काही आमदारांना फिरती मंत्रिपदे दिली जातील. त्यानुसार मंत्रिपदी आमदार अडीच-अडीच वर्षे काम करतील, असे सांगितले जात आहे.
मुंबई: महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता राजकीय वर्तुळाला मंत्रिमंडळ विस्ताराचे (Maharashtra Cabinet) वेध लागले आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरुवातीपासूनच गृहमंत्रीपदाचा तिढा असताना आता मर्यादित खाती मिळणार असल्याने मंत्रिपदी कोणाला संधी द्यायची, यावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या 57 आमदारांपैकी जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यासाठी एक वेगळाच पॅटर्न अंमलात आणायचे ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता शिवसेनेच्या आमदारांना फिरती मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सध्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाची चर्चा सुरु आहे. गेल्यावेळी संधी हुकलेल्या शिवसेनेतील अनेक आमदारांना यंदा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात होणार नाही, काही मंत्रिपदे पुढील विस्तारासाठी राखून ठेवली जातील. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला आठ ते दहापेक्षा जास्त मंत्रिपदे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे इच्छूक आमदारांची नाराजी थोपवून धरण्यासाठी अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रीपदे देण्याचा तोडगा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्याचे वृत्त 'दैनिक लोकसत्ता'मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला काहीसे अनपेक्षित यश मिळाले होते. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला होता. याशिवाय, अपक्ष आणि सहयोगी आमदार मिळून भाजपचे संख्याबळ 137 पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर खूपच कमी झाली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांच्या वाट्याला 21 ते 22 मंत्रिपदे जाणार आहेत. त्यामुळे उर्वरित मंत्रिपदांमध्ये शिंदे गट आणि अजितदादा गट अशा दोघांनाही भागवून घ्यावे लागणार आहे. मात्र, शिवसेनेचे 57 आमदार निवडून आल्याने मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्यांची संख्याही जास्त आहे. परंतु, शिवसेनेच्या वाट्याला एकूण 12-13 मंत्रिपदे आल्यास त्याचा मेळ कसा घालायचा, ही मोठी समस्या एकनाथ शिंदे यांच्यापुढे निर्माण झाली आहे. त्यामुळे अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रिपदे देऊन पक्षातील जास्तीत जास्त आमदारांना संधी देण्याचा पॅटर्न एकनाथ शिंदे यांच्याकडून अंमलात आणला जाऊ शकतो, असे समजते.
शिवसेनेत मंत्रिपदाची संधी कोणाला?
महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतरही अद्याप एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री बिनखात्याचे आहेत. येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून गेल्यावेळी संधी हुकलेले महाडचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक हे मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. तर भाजपने अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संजय राठोड आणि तानाजी सावंत या दोन आमदारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास विरोध दर्शविला आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे समजते. बंजारा समाजात संजय राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर अब्दुल सत्तारही मंत्रिपद न मिळाल्यास नाराज होऊ शकतात. त्यामुळे या आमदारांना कसे डावलायचे, हा मोठा प्रश्न शिंदे यांच्यासमोर आहे. सर्व इच्छूक आमदारांना मंत्रीपद देणे शक्य नसल्याने फिरत्या मंत्रिपदाचा तोडगा काढण्यात आला आहे. मात्र, हा तोडगा शिवसेनेच्या आमदारांना कितपत मान्य होईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
आणखी वाचा
दीपक केसरकरांसह तीन विद्यामान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेणार?