Maharashtra Cabinet Expansion: उदय सामंत, दादा भुसे ते प्रताप सरनाईक, भरत गोगावले; मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदेंची टीम तयार, पाहा आज शपथ घेणाऱ्यांची यादी!
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे.
Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज पार पडणार आहे. दुपारच्या सुमारास नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळा होईल. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रिपद रिक्त ठेवले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे. तसेच गृहनिर्माण आणि पर्यटन हे दोन खाती शिवसेनेकडे असणार अशी माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय शिरसाट, योगेश कदम यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे.
कशी असेल टीम एकनाथ शिंदे-
पाच जणांवर पुन्हा विश्वास-
1) उदय सामंत, कोकण
2) शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3) गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4) दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5) संजय राठोड, विदर्भ
टीम शिंदेचं नवे शिलेदार
1) संजय शिरसाट, मराठवाडा
2) भरतशेठ गोगावले, रायगड
3) प्रकाश अबिटकर, पश्चिम महाराष्ट्र
4) योगेश कदम, कोकण
5) आशिष जैस्वाल, विदर्भ
6) प्रताप सरनाईक, ठाणे
कुणा कुणाचा पत्ता कट -
1) दीपक केसरकर
2) तानाजी सावंत
3) अब्दुल सत्तार
आज संध्याकाळी शपथविधी सोहळा-
दरम्यान राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात तेवढ्या क्षमतेचा सभागृह नाही, त्यामुळे राजभवनाच्या लॉनवर शपथविधी सोहळा होऊ शकेल अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरात
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज पहिल्यांदा नागपूर मध्ये आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे.