Cabinet Expansion: महायुतीचा शनिवारी मंत्रीमंडळ विस्तार? दिल्लीत भेटीनंतर घडामोडींना वेग, शिंदेंना नगरविकास गृह महसूल मिळणार का?
Maharashtra cabinet expansion: हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होणार असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात शनिवारी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांवर हिवाळी अधिवेशनानंतर विविध खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुका होऊन आणि निकाल लागून आता अनेक दिवस झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी पार पडतो, याकडे लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (बुधवारी) रात्री दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे. तर भाजपला किमान 23 मंत्रिपदे हवी असून, सध्या तरी त्यांच्याकडून 25 मंत्रिपदांची मागणी केली जात आहे. शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. फडणवीसांची अमित शहांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होणार असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात शनिवारी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांवर हिवाळी अधिवेशनानंतर विविध खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी आता 14 डिसेंबरचा मुहूर्त असल्याच्या चर्चेने आमदारांची धाकधूक वाढली आहे. त्याचबरोबर काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे.
शिवसेनेच्या या नेत्यांना भाजपचा विरोध
आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. शिवसेनेतील काही आमदारांनीही सत्तार यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती आहे. डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही सत्तेत सामील करून घेण्यास भाजपचा विरोध आहे. शिंदे मात्र सावंत यांच्या समावेशाबाबत आग्रही आहेत. सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून उत्तम काम केले असल्याचे त्यांनी भाजपला सांगितले आहे.
शिवसेना आमदारांचा देखील पक्षातील काही नेत्यांना विरोध
महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदे पाहता पुन्हा जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी नव्या चेहऱ्यांचा समावेश करावा, अशी चर्चा शिवसेना आमदारांमध्ये आहे. विशेषतः आधीच्या मंत्रिमंडळातील चार-पाच मंत्र्यांना या आमदारांचा विरोध आहे. या मंत्र्यांनी आधीच्या कार्यकाळात आमदारांची कामे केली नसल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असे आमदारांचे म्हणणे आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपचे जास्त आमदार विजयी झाल्याने ठाण्याचे पालकमंत्रिपद भाजपच्या मंत्र्याकडे द्यावे, असा भाजपचा आग्रह आहे.