(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Loksabha Election 2024: महायुतीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजपला ३२, शिवसेना १२ तर अजितदादा गटाला अवघ्या ४ जागा
Loksabha seat sharing: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वाटाघाटींना सध्या वेग आला आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक जागा आल्या आहेत. तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला तडजोड करावी लागली आहे.
मुंबई: भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. महाविकास आघाडीत जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. फक्त ८ जागांवरुन तिढा कायम आहे. तर दुसरीकडे आता महायुतीमधील (Mahayuti) घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभेचे जागावाटप (Loksabha Election 2024) कसे होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती. महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या वाटयाला सर्वाधिक ३२ जागा येतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येतील. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते. त्यामुळे अजित पवार नाराज होण्याची शक्यता आहे. परंतु, लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळू शकतो. परंतु, त्यासाठी शिंदे गट आणि अजितदादा गट राजी होणार का, हे पाहावे लागेल. सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु, अंतिम निर्णय हा दिल्लीतून होईल, असे सांगितले जात आहे. यामध्ये अमित शाह महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
शिंदे गटातील कोणत्या खासदाराचा पत्ता कट होणार?
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेचे एकूण १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र, सध्याच्या फॉर्म्युलानुसार लोकसभेला शिंदे गटाच्या वाट्याला फक्त १२ जागाच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका खासदाराचा पत्ता कट होईल. हा खासदार कोण असणार, हे आता ठरवावे लागेल. शिंदे गटाने यापूर्वी लोकसभेच्या १८ जागांची मागणी केली होती. परंतु, भाजप महाशक्ती असल्याने त्यांना फक्त १२ जागांवरच समाधान मानावे लागू शकते. तर अजित पवार गटाकडे सध्या राष्ट्रवादीचे तीन खासदार आहेत. तरीही त्यांच्या वाट्याला लोकसभेच्या चार जागा येतील. परंतु, मंत्रीपदापासून ते निधीवाटपात कायम स्वत:च्या गटाचा वरचष्मा ठेवणारे अजित पवार लोकसभेच्या फक्त ४ जागा घेण्यासाठी राजी होतील का, हा प्रश्नच आहे.
महाविकास आघाडीत ठाकरेंच्या वाट्याला लोकसभेच्या १८ जागा
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. मविआच्या नेत्यांमध्ये ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्याकडून १८ लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट लोकसभेच्या या १८ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जाते.
आणखी वाचा
मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात, रावेर अन् जळगावचा तिढा सुटला, लवकरच घोषणेची शक्यता