Akola Loksabha: मोठी बातमी: अकोला लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसची एन्ट्री, डॉ. अभय पाटलांना उमेदवारी; प्रकाश आंबेडकर काय करणार?
Maharashtra Politics: 1989 पासून आतापर्यंत अकोला मतदारसंघावर भाजपचा (BJP) झेंडा आहे. यंदा अकोल्यातून भाजपकडून अनुप धोत्रे आणि वंचितकडून प्रकाश आंबेडकर रिंगणात उतरले आहेत. आता काँग्रेसनेही डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरुन झाले असले तरी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून आतापर्यंत वाद नसलेल्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. परंतु, अंतिम जागावाटपाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. अशातच आता काँग्रेसने (Congress) अकोला लोकसभा मतदारसंघातून (Akola Loksabha) उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे.
काँग्रेसची उमेदवारी डॉ. अभय पाटील यांना देण्याबाबत काँग्रेस संसदीय मंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या निर्णयावर स्वत: डॉ. अभय पाटील यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना दुजोरा दिला. 4 एप्रिल रोजी डॉ. अभय पाटील अकोल्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या निर्णयामुळे प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात काँग्रेस पाठिंबा देणार या चर्चांना मिळणार पुर्णविराम मिळाला आहे. डॉ. अभय पाटील यांनी अकोल्यात महाविकास आघाडीकडून प्रचारही सुरु केला आहे.
अकोल्यात भाजपने संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर लढणार आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जरी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतला तरी आतापर्यंत नागपूर आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघात काँग्रेसला पाठींबा दिला आहे. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पाठींबा देणार असल्याची एक चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, अकोल्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे.
अकोल्यात काँग्रेसची कामगिरी निराशाजनक
काँग्रेसने अकोल्यात उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला असला तरी या मतदारसंघातील काँग्रेसची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही. 1989 सालापर्यंत अकोला मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1984 साली मधुसूदन वैराळे यांच्या रूपाने या मतदारसंघात काँग्रेसला शेवटचा विजय मिळाला होता. त्यानंतर या जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावरून काँग्रेस हद्दपार झालीय ती कायमचीच. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. मात्र, काँग्रेसला 1984 नंतर एकाही निवडणुकीत अकोल्यात विजय मिळालेला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे भाजपच्या अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा
अकोला लोकसभा मतदारसंघात 'राजकीय वादळा' पूर्वीची शांतता; प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपची थेट लढत