काँग्रेससोबतची मैत्री केजरीवालांसाठी लॉटरी? सर्वेक्षणाचा निष्कर्ष समोर; आगामी लोकसभेत 'आप'ला किती जागा मिळणार?
Lok Sabha Election 2024: इंडिया टीव्ही सीएनएक्सनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वेक्षण केलं आहे. त्यानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए तिसऱ्यांदा 300 चा आकडा पार करू शकते, असा निष्कर्ष समोर आला आहे.
Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सत्ताधारी एनडीएसह (NDA) विरोधी आघाडी इंडियानंही (INDIA) कंबर कसली आहे. 26 विरोधी पक्षांच्या एका व्यासपीठावर येण्याचा उद्देश पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) नेतृत्वाखालील विद्यमान सरकारची हकालपट्टी करणं हाच आहे, असा दावा इंडियामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी केला आहे. त्याचबरोबर एनडीएही सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष समोर आला असून, त्यानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन होऊ शकतं.
इंडिया टीव्ही सीएनएक्सनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वेक्षण केलं आहे. त्यानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए तिसऱ्यांदा 300 चा आकडा पार करू शकते, असा निष्कर्ष समोर आला आहे. एनडीएला 318 जागा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणाच्या निष्कर्षात वर्तवण्यात आली आहे. ज्यामध्ये एकट्या भाजपला 290 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. विरोधी आघाडी 175 जागांवर विजयी होणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे, तरी या आकडेवारीनुसार सरकार बदलू शकत नाही हे स्पष्ट झालं आहे. इतर पक्षांना सर्वेक्षणात 50 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
'आप'च्या जागांमध्ये 10 पट वाढ
सर्वेक्षणाच्या निकालानुसार, काँग्रेस सलग तिसऱ्यांदा दुहेरी आकड्यांपर्यंत खाली येऊ शकते. एकट्या काँग्रेसला एकूण 66 जागा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणात वर्तवण्यात आली आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये 14 जागांची वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 'इंडिया'मध्ये सामील झाल्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. सर्वेक्षणात 'आप'ला 10 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. यानुसार काँग्रेससोबतची युती आपला नक्कीच फायदेशीर ठरणार, हे जवळपास सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.
पंजाबमध्ये जागा वाढणार, दिल्लीत खातं उघडता येणार?
सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आपनं काँग्रेससोबत इंडियातून निवडणूक लढवल्यास आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय राजधानीतही आपलं खातं उघडू शकतं. दिल्लीत 'आप'ला 2 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर दिल्लीतील उर्वरित जागांवर भाजपचा विजय अपेक्षित आहे. दरम्यान, दिल्लीत लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत.
याशिवाय पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत, त्यापैकी 'आप'ला येथून 8 जागा मिळू शकतात. तर उर्वरित 5 जागा काँग्रेसच्या पारड्यात जाऊ शकतात. गेल्या वेळी केजरीवाल यांच्या पक्षानं येथून एक जागा जिंकली होती. तर 2014 च्या निवडणुकीत 'आप'नं पंजाबमधून 4 जागा जिंकल्या होत्या. या आकड्यांवर नजर टाकली तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :