Congress On Sangli Lok Sabha: मोठी बातमी : काँग्रेसचा बडा नेता ठाकरेंवर नाराज, सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत तेढ!
Congress Sangli Lok Sabha Constituency: शिवसेनेने युती धर्म पाळला पाहिजे आणि फेरविचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या बड्या नेत्याने एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी (Shivsena UBT Candidate List) जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा कायम असताना ठाकरेंनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेने युती धर्म पाळला पाहिजे आणि फेरविचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेची घोषणा केली त्याबद्दल आमच्या सर्वांची नाराजी आहे. युती आघाडीचा धर्म पाळला पाहिजे यावर त्यांनी विचार केला पाहिजे होता आता पुन्हा फेरविचार केला पाहिजे. भिवंडी, सांगली या पारंपारिक आमच्या जागा आहेत. मुंबईत एक जागा दिलेली आहे. आणखी एक जागा द्यावा आमची अपेक्षा आहे. मात्र तसं न करता आघाडी धर्म पाळला नाही त्यांनी काळजी घेणे आवश्यक होतं. ती त्यांनी घेतली नाही. या जागांवरती आम्ही आणि आमचे कार्यकर्ते अजूनही ठाम आहेत. दिल्लीतील आमचे नेतेही यावरती आग्रही आहेत. सांगलीची जागा ही वसंतदादा पाटील यांच्यापासून राहिलेली आहे.या जागा सोडणे आम्हाला खूप वेदनादायी आहेत त्यामुळे याचा फेरविचार झाला पाहिजे. सांगली, भिवंडी आणि मध्य मुंबई यासाठी अजूनही आम्ही आग्रही आहे आणि प्रयत्न करत आहोत त्यांनी फेरविचार करावा.
वेळ गेलेली नाही, प्रकाश आंबेडकरांनी अजूनही चर्चा केली पाहिजे : बाळासाहेब थोरात
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, सध्याच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत पाहिजेत अजूनही वेळ गेलेली नाही याचा विचार केला पाहिजे. त्यांना काय पाहिजे या संदर्भातही त्यांनी चर्चा केली पाहिजे आघाडीची भूमिका आहे. त्यांनी आमच्या सोबत राहील पाहिजे. या परिस्थितीमध्ये जनतेचा विश्वास आमच्या सोबत आहे. त्यामुळे जागा वाढवून मिळावा हे कोणाचीही भूमिका असेल. प्रकाश आंबेडकरांनी 16 जागांचा प्रस्ताव पाठवलेला होता आम्हीही पाच जागांचा प्रस्ताव दिला होता. मराठा समाजामध्ये नाराजी आहे ती सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे त्यामुळे ती सरकारच्या विरोधामध्ये काम करेल. प्रकाश आंबेडकरांनी अजूनही चर्चा केली पाहिजे आणि भूमिका बदलली पाहिजे. सर्वच पक्षांमध्ये अडचणी सुरू आहेत त्यामुळे आमच्या पक्षातील अडचणीही आम्ही सोडू त्यात काही विषय नाही.
आघाडी धर्माला गालबोट: वडेट्टीवार
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, महाविकास आघाडीचा जागावाटप चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले. उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे हे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा.
हे ही वाचा :
नो मशाल, ओन्ली विशाल, सांगलीत काँग्रेस आक्रमक; ठाकरेंच्या उमेदवाराला थेट विरोध