Kolhapur Loksabha : महाडिक, मंडलिक, मुश्रीफ, घाटगे, शाहू महाराजांसाठी बावड्याचे बंटी पाटील किती जणांना भिडणार?
Kolhapur Loksabha, Satej Patil vs Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिलीये.
Kolhapur Loksabha, Satej Patil vs Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिलीये. तर शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे लोकसभेचा सामना शाहू महाराज विरूद्ध संजय मंडलिक (Sanjay Mandlik) असा आहे. मात्र, पडद्यामागील लढाई वेगळी आहे. कोल्हापूरच्या लोकांना काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यातील राजकीय वैर नवं नाही. कोल्हापुरात कोणतीही निवडणूक असो त्याला सतेज पाटील विरूद्ध महाडिक ही किनार असतेच. यावेळीही असच काहीस चित्र आहे. मात्र यावेळी सतेज पाटील यांच्यासमोरची आव्हान मोठी आहेत.
2019 मध्ये ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, त्यांना पराभूत करण्याचं आव्हान
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या विजयासाठी सतेज पाटलांनी जिवाचं रान केलं, त्याच संजय मंडलिकांना पराभूत करण्याचे आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर आहे. यावेळी धनंजय महाडिक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजितसिंह घाटगे युतीधर्म पाळून संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे 2019 मध्ये जे संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे सतेज पाटलांचे एका अर्थाने मित्र होते. ते या निवडणुकीत त्यांचे राजकीय शत्रू झाले आहेत. शिवाय कोल्हापुरातील काँग्रेस पक्षाची धुरा एकट्या सतेज पाटलांच्या खांद्यावर असते, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सतेज पाटलांचा सामना धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे अशा महायुतीच्या सर्वच नेत्यांशी असणार आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या विजयासाठी सतेज पाटील महायुतीच्या चारही नेत्यांशी भिडणार आहेत.
2019 मध्ये धनंजय महाडिकांचा पराभव
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक पातळ्यांवर बदल झाले. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो, याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आलाय. कोल्हापुरातील राजकारणात असचं चित्र पाहायला मिळत आहे. सतेज पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव करण्यासाठी संजय मंडलिक यांना साथ दिली होती. तर हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही महाडिकांचा पराभव करण्यासाठी छुपी मदत केली, असा आरोप केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका धनंजय महाडिक यांना बसला होता. "मला उमेदवारी मिळू नये, यासाठी हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले होते", असं धनंजय महाडिक यांनीच भाजपात प्रवेश केल्यानंतर म्हटल होतं. शिवाय, राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी दूर करणे, शरद पवारांना जमले नाही, असही महाडिक यांनी स्पष्ट केलं होतं.
मुश्रीफ, घाटगेंकडून मंडलिकांचा प्रचार
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी 2019 ची विधानसभा एकमेकांविरुद्ध लढवली होती. मात्र, दोन्ही युती धर्म पाळून संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. शिवाय, धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. छोट्या बैठकीपासून मोठ्या सभांपर्यंत महाडिक यांची उपस्थिती लक्षणीय आहे.
मतदारसंघात कोणाचे किती आमदार ?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे 3, शिवसेना शिंदे गटाचा 1 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. जयश्री जाधव. पीएन पाटील आणि ऋतुराज पाटील असे कॉंग्रेसचे 3 आमदार आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये ही जागा कॉंग्रेस पक्षाला सुटली आहे.
मंडलिकांचे दत्तक प्रकरणावर वादग्रस्त विधान
संजय मंडलिक यांनी या निवडणुकीत शाहू महाराजांचे दत्तक प्रकरण पुढे आणले आहे. आताचे शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत का? असा सवाल करत ते सुद्धा बाहेरून आलेले आहेत, असा सवाल संजय मंडलिक यांनी केलाय. शिवाय जनता हीच खरी वैचारिक वारस आहे, माझ्या वडिलांनी पुरोगामी विचार जपला, असही मंडलिक यांनी म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!