Kalaben Delkar : ठाकरेंचा खासदार भाजपने ढापला! पडत्या काळात साथ देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सोडून कलाबेन डेलकर भाजपच्या उमेदवार
Kalaben Delkar BJP Candidate : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर कलाबेन डेलकर यांनी भाजपवर आरोप करत शिवसेनेत प्रवेश केला होता. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या निवडून आल्या.
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे राज्यातील अनेक नेते सोडून त्यांना सोडून जात असताना आता राज्याबाहेरही त्यांना मोठा धक्का बसल्याचं दिसतंय. शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या दादरा नगर हवेलीच्या (Dadra & Nagar Haveli) खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज नावांसोबत दादरा नगर हवेलीमधून कलाबेन डेलकर यांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेच्या डेलकर यांना भाजपच्या यादीत स्थान मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.
पतीने आत्महत्या केल्यानंतर भाजपवर आरोप केले होते
कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर दादरा नगर हवेलीच्या प्रशासकाविरोधात आरोप करत कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2022 साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं कलाबेन डेलकर यांना निवडूनही आणलं होतं. पण कलाबेन डेलकर यांनी त्यांची साथ सोडून भाजपची उमेदवारी मिळवली आहे.
कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर यांनी केलेल्या आत्महत्येनंतर भाजपच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले होते. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी दादरा नगर हवेलीचे प्रशासक कारणीभूत असल्याचं कलाबेन डेलकर यांनी आरोप केला होता.
पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर विजय
मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि शिवसेना ठाकरे गटाने कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सेनेचे अनेक मोठे नेते दादरा नगर हवेलीमध्ये तळ ठोकून होते. त्या निवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 51 हजार मतांनी पराभव केला होता.
कलाबेन डेलकर यांच्या पडत्या काळात उद्धव ठाकरे यांनी त्यांना साथ दिली होती. त्यांच्या विजयासाठी नियोजन करून भाजपला धडा शिकवला होता. आता त्याच कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं आहे.
अमित शाहांच्या भेटीनंतर राजकीय दिशा बदलली
डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह हे दादरा नगर हवेलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कलाबेन डेलकर यांनी त्यांची भेट घेतली होती, तसेच शाहांच्या स्टेजवरही त्या दिसून आल्या होत्या. त्यानंतर कलाबेन डेलकर या भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता भाजपने आपल्या उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या कलाबेन डेलकर यांना उमेदवारी जाहीर करत भाजपने ठाकरेंना शह दिल्याचं मानलं जातंय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्याला कसं प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागेल.
कोण होते मोहन डेलकर?
दिवंगत खासदार मोहन डेलकर हे लोकसभा निवडणुकीत सात वेळेस निवडून आले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहन डेलकर यांनी भाजप खासदार नथुभाई पटेल यांचा 9000 मतांनी पराभव केला होता. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये 22 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.
ही बातमी वाचा: