भाजपविरुद्धच्या तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रातून सुरुवात, उद्धव ठाकरे आणि केसीआर यांची संयुक्त पत्रकार परिषद
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची भेट घेतली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची भेट घेतली. याभेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि केसीआर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहोत, असं म्हणत केसीआर यांनी देशात भाजपविरुद्ध तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या तिसऱ्या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे, असं म्हणता येईल.
आमच्या भेटीत लपवाछपवीसारखं काहीही नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशी चर्चा होती. तो दिवस आज उजडला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी भेट झाली आहे. हे आमच्यासाठी सौभाग्य आहे. आमच्यातील सदिच्छ भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली. संपूर्ण देशात राज्य एकमेंकाचा शेजारधर्म विसारले आहेत. पण राज्याराज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण
या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर राव म्हणाले की, ''महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे.'' ते म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोलण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना भेटून खूप आनंद झाला. देशाच्या विकासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार आहे. तेथे आम्ही एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत."
भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर - केसीआर
भाजपवर हल्लाबोल करत केसीआर म्हणाले आहेत की, ''भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. केंद्र सरकारने आपलं धोरण बदलायला हवं. असं न केल्यास पुढे जाऊन त्यांना हे सर्व भोगावे लागणार आहे.''
दोन्ही राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर
दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीत आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्यात विस्तृत चर्चा झाली. तसेच राज्यात सुरू असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजना, प्रकल्पांचीही चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री राव यांच्यासोबत शिष्टमंडळात खासदार रणजित रेड्डी, खासदार संतोष कुमार, खासदार बी. पी. पाटील, आमदार पल्ला राजेश्वर रेड्डी, आमदार के. कविता, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे महासचिव श्रवण रेड्डी, तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज उपस्थित होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह उपस्थित होते. ही बैठक जवळपास दीड तास सुरू होती. ज्यात दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली.