(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन् बायकोला घालतात, पाकीटमार कधीतरी पकडला जातो; आव्हाडांची अजितदादांवर टीका
Maharashtra Politics: जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. अजित पवार यांना सुरुवातीपासूनच भाजपसोबत जायचे होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. भाजपसोबत जाण्यासाठीच्या पत्रावर सह्या करण्याच्या प्रस्तावाला मी विरोध करु शकलो नाही
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले आहे. दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन ते बायकोला घालू शकतात. पण येणारा काळच ठरवेल की, कोणतं मंगळसूत्र खरं आहे. पाकीटमार हे कधीतरी पकडला जातोच, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. ते गुरुवारी 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात बोलत होते. 2019 ला शरद पवार यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले, ही सर्वात मोठी चूक होती. कारण एकदा गद्दारी केल्यानंतर ती व्यक्ती कायमच गद्दार असते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
तेव्हा अजित पवारांविरोधात बोलण्याचं धाडस माझ्यात नव्हतं: जितेंद्र आव्हाड
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पक्षाच्या सर्व आमदारांनी भाजपसोबत जाण्याच्या पत्रावर सह्या केल्या होत्या. मात्र, हे पत्र शरद पवार यांच्याकडे जाणार होते. मला ही गोष्ट मान्य नव्हती. पण तेव्हा अजित पवार यांच्यासमोर बोलण्याचे धाडस माझ्यात नव्हते. त्यामुळे मी या पत्रावर सही केली होती. बैठक संपल्यानंतर मी जयंत पाटील यांना गाठून त्या पत्रावरील माझे नाव आणि सही खोडा, असे सांगितले होते. अजित पवार हे तेव्हा शरद पवार यांच्या सावलीत होते. त्यामुळे काय होईल,याची कल्पना नव्हती. त्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठीच्या पत्रावर सह्या करण्याच्या प्रस्तावाला मी विरोध करु शकलो नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे ज्यादिवशी शिवसेनेतून फुटून बाहेर पडले तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. तेव्हा अजित पवार सतत फोनवर कोणाशी तरी बोलत होते. तो फोन कोणाचा होता, माहिती नाही. तेव्हा बहुसंख्य आमदार म्हणाले, चला अजितदादा भाजपमध्ये जाऊ. निफाडचा आमदार म्हणाला शरद पवार यांना एकटं काढा, आपण सगळेच जाऊ. या पातळीपर्यंत तयारी झाली होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
शरद पवारही माणूस आहे, त्यांनाही वेदना होत असतील: जितेंद्र आव्हाड
शरद पवारही एक माणूस आहे. त्यालाही हृदय आहे. एकांतात असताना त्यांनाही वाटत असेल, माझं काय चुकलं? पाण्यात पोहणाऱ्या माशाला अश्रू येत नाही म्हणजे तो रडत नाही, त्याला वेदना होत नाही, असं वाटतं का? शरद पवार हे विचार करत असतील, मी हसन मुश्रीफांना कुठून कुठे आणलं? कागलमध्ये 98 टक्के मराठा आणि बहुजन समाज आहे. मात्र, या मतदारसंघात उमेदवारी देऊन हसन मुश्रीफांना निवडून आणलं, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. सुनील तटकरे यांना शेकापचा विरोध असताना 1999 साली मंत्री करणं शक्य होतं का? भुजबळांचे सगळे स्कॅम असूनही 2020 मध्ये मंत्रिमंडळात पहिल्या तिघांमध्ये त्यांना शपथ दिली, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा