Bharat Gogawale : सुनील तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांना विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावीच लागेल, नाहीतर..., भरत गोगावलेंचा थेट इशारा
Bharat Gogawale : राजकारणात काही गोष्टी होतच राहतात, मी एक ना एख दिवस रायगडचा पालकमंत्री होणारच असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे.
रायगड: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत, एकमेकांना इशारा देत आहेत. पण रायगडमध्ये मात्र महायुतीमध्ये वेगळंच सुरू असल्याचं दिसतंय. सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) खासदारकीची गॅरंटी आम्ही घेतलीय, त्यांना विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावीच लागेल असं शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी म्हटलं आहे. जर त्यांनी विधानसभेला आमची गॅरंटी घेतली नाही तर आम्ही त्यांना दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला.
रायगडमधील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी भरत गोगावले यांनी त्यांना हा इशारा दिला. ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने शिवसेना शिंदे गट नाराज होता. पण वरून आदेश आल्यामुळे शिवसेना नेत्यांना सुनील तटकरेंना मदत करावी लागणार आहे.
तर त्यांना दाखवून देऊ
भरत गोगावले म्हणाले की, आज आम्ही सुनील तटकरे यांच्या खासदारकीची गॅरंटी घेतली आहे. विधानसभेला त्यांना आमची गॅरंटी घ्यावीच लागेल. जर त्यांनी आमची गॅरंटी घेतली नाही तर आम्ही त्यांना दाखवून देऊ, शेवटी आम्ही देखील रायगडचे मावळे आहोत.
पालकमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारल्यानंतर भरत गोगावले म्हणाले की, मी आज ना उद्या रायगडचा पालकमंत्री होणारच आहे, उगाच कशाला जुन्या खपल्या काढताय? झालं गेलं विसरून गेलो ,राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात.
नाशिकचा दावा अद्याप सोडला नाही
नाशिक लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार यावर अंतिम फैसला अद्याप व्हायचा आहे. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, नाशिक लोकसभेचा क्लेम आम्ही अद्याप सोडलेला नाही. आज संध्याकाळी किंवा उद्या नाशिक लोकसभेचा अंतिम निर्णय होईल.
सध्या अल्पसंख्यांक समाजाला बदनाम करण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे. महाविकास आघाडीने अल्पसंख्यांक समाजाची कोणतीच कामं केली नाही. मी कामाच्या जोरावर अल्पसंख्याक समाजाच्या मतांसह याठिकाणी खासदार होणार आहे. जे गीते आमच्यावर आता टीका करत आहेत, त्यांनी वीस वर्षात काय केलं याचे उत्तर द्यावं.
कोकणातली एकही जागा शिंदेंना नाही
रायगडच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक होता. सिंधुदुर्ग-रत्नागिरी किंवा रायगड, या दोन्हीपैकी एक तरी जागा ही शिवसेनेला मिळावी यासाठी शिंदे गटाचा आग्रह होता. पण रायगडची जागा ही राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना देण्यात आली. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून भाजपच्या नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली.
ही बातमी वाचा: