Video: आव्हाड-पडळकर समोरासमोर भिडले; तुझ्या गांxx दम किती बघतो, विधानभवनाबाहेरच नेत्यांचा राडा
=आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जात असताना "मंगळसूत्र चोराचा...मंगळसूत्र चोराचा..", अशा घोषणा दिल्या होत्या.

मुंबई : सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची जुगलबंदी आणि एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. मात्र, टोलेबाजी, जुगलबंदी आता थेट शिवीगाळ होण्यापर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. कारण, विधिमंडळ सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्यात शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची चर्चा विधानभवन परिसरात होत आहे. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी विधानभवनात जात असताना रेड कार्पेटरवरच नाव न घेता घोषणाबाजी करत गोपीचंद पडखळकरांना डिवचलं होतं. आता, या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जात असताना "मंगळसूत्र चोराचा...मंगळसूत्र चोराचा..", अशा घोषणा दिल्या होत्या. आव्हाड यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरुन, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडले होते. सोशल मीडियातून दोन्ही नेत्यांचा व्यंगात्मक फोटो व्हायरल केले जात होते. मात्र, आच चक्क हे दोन्ही नेतेच भिडल्याचं पाहायला मिळालं. विधानभवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाल्याने एकच खळबळ उडाली. गोपीचंद पडळकर यांनी कारमधून उतरताना गाडीचा दरवाजा जोरात ढकलला. मात्र, मुद्दाम हा दरवाजा जोरात ढकलला आणि तो मला लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यावरुन, या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.
भाजपचे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पातळी सोडून टीका करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी नाव न घेता शरद पवार कुटुंबीयांवर घणाघाती आणि जातीवाचक टीका केली होती. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही त्याच्यावर पलटवार होत आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर उपस्थित असताना "मंगळसूत्र चोराचा...मंगळसूत्र चोराचा..", अशा घोषणा दिल्या आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनीही नाव न घेता त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं, असे म्हटले जाते.
पाहा व्हिडिओ - Video
मंगळसूत्र चोर म्हणत राष्ट्रवादीकडून टीका
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोरल्याचा आरोप केला आहे. "गोपीचंद पडळकर ही एक वाईट प्रवृत्ती आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरली. ज्यांना ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक निवडणुकांमध्येही विजय मिळवता येत नाही, अशा लोकांना भाजपकडून मोठी पदं देण्यात येतात आणि त्यांच्याकडून विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांविरोधात खालच्या भाषेत बोललं जातं, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे.
View this post on Instagram



















