(Source: Poll of Polls)
Jayant Patil on Ajit Pawar : आता शेतकऱ्यांची माफी मागून काय फायदा? जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचलं
Jayanat Patil on Ajit Pawar : अजित पवार यांनी निफाडमधील सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफीच मागितली. यावरून जयंत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
Jayant Patil on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. शेतकर्यांनी सरकारविरोधात मतदान केल्याने अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांच्या नाराजीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निफाडमधील सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफीच मागितली. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
निफाडमधील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी आता बीज बिल भरायचे नाही. मागचे थकलेले बिलही द्यायचे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, असे त्यांनी म्हटले.
आता माफी मागून काय फायदा?
अजित पवारांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यानंतर जयंत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले की, जो बुंद से गयी वो, हौदसे नहीं आती, आता माफी मागून काय फायदा आहे? तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला हवी होती. कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता. हे सगळे दिल्लीला जातात ते केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी जातात. कांदा उत्पादकांसाठी कुणीच गेलं नाही. कांदा उत्पादकांसाठी गुजरातला न्याय मिळाला. त्यावेळी महाराष्ट्र गप्पच होता. त्यानंतर महाराष्ट्रात हळूहळू कांदा निर्यात सुरू झाली. कांद्याला दर मिळवून आणला असता तर ही वेळ आली नसती. कांदा निर्यातीत अक्षम्य अपराध झालेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी याचे प्रायश्चित्त सरकारला निश्चितच देतील, असे त्यांनी म्हटले आहे.
जनसन्मान यात्रेवर जयंत पाटलांचा खोचक टोला
दरम्यान, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची हवा दिसून येत आहे. यावरून देखील जयंत पाटलांनी खोचक टोला लगावला आहे. जयंत पाटील म्हणाले की, आमची यात्रा ही साधी आहे. आमचा कोणताही इव्हेंट नाही. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडत आहोत. त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर टीका केली आहे.
आणखी वाचा
'मी उगाच गुलाबी स्वप्न दाखवत नाही, माझ्यात स्वप्न पूर्ण करण्याची धमक'; अजित पवारांचं नाशकात वक्तव्य