मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मी लोकसभा लढवली नाही तर मला पाथर्डी-शेवगाव विधानसभेची ऑफर झाली होती. माझ्यासाठी दररोज एक-एक मतदारसंघ तयार होत होता.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात यंदा माजी खासदार आणि भाजप नेत्या प्रितम मुंडे (Pritam munde) यांचं तिकीट कापून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, बीडमधील सामाजिक व राजकीय परस्थितीचा फटका बसल्याने पंकजा मुंडे (Pankaja munde) यांचा पराभव झाला. मात्र, प्रितम मुंडे यांचं तिकीट कापल्याने त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार का, त्यांना आमदारकीला किंवा राज्यसभेवर संधी मिळणार का, असा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांना संधी देण्यात आली नाही. प्रितम मुंडे यांनी पाथर्डी मतदारसंघात भाषण करताना मनातील खंत बोलून दाखवली. माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पाथर्डी मतदारसंघात सभेचं आयोजन करण्यात आले होते. येथील सभेत बोलताना त्यांनी मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तिवत्व निर्माण करायचं नाही, असे म्हणत मनातील खदखद बोलून दाखवली.
मी लोकसभा लढवली नाही तर मला पाथर्डी-शेवगाव विधानसभेची ऑफर झाली होती. माझ्यासाठी दररोज एक-एक मतदारसंघ तयार होत होता. पण, मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही, असे म्हणत नेमका कोणाला टोला लगावला ह्याची चर्चा मतदारसंघात आणि बीड जिल्ह्यात सुरू झाली आहे. तसेच, मी प्रीतम गोपीनाथ मुंडे आहे, मुंडे साहेबांनी अनेक संघर्ष पाहिले तर माझ्या वाट्याला पण थोडासा संघर्ष येणारच ना?. गोपीनाथ मुंडे यांची लेक हेच पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे, असेही प्रितम यांनी म्हटलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रतिम मुंडेंना तिकीट नाकारुन पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली होती. तर, लोकसभेत पराभव झाल्यानंतरही त्यांना विधानपरिषदेची संधी मिळाली. मात्र, प्रितम मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालं नाही. त्यामुळेच, आजच्या सभेतून त्यांनी मनातील खदखद बोलून दाखलवली.
आपल्याला राज्यात महायुतीचे पुन्हा हात बळकट करायचे आहे, 2019 ला माझ्या सभेसाठी पंकजा मुंडे यांना वेळ देता आला नाही. स्वतःच्या बहिणीसाठी त्यांना वेळ देता आला नाही, त्यांचे शेड्युल खूप व्यस्त असतं ते त्यांच्या वेळेनुसार पाथर्डी-शेवगावमध्ये येतील, त्यांचे निरोप वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत राहतील. मात्र, मी आता ठरवलं आहे की, मला जेंव्हा उदास वाटेल तेंव्हा मी पाथर्डीला येईल. मला इथे आल्यावर एनर्जी मिळते, असे म्हणत पाथर्डी मतदारसंघाबद्दल वेगळाच जिव्हाळा असल्याचं प्रितम मुंडे यांनी दाखवून दिलं.