स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
निवडणूक काळासाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमध्ये मतदारांना राजकीय पक्षांनी अथवा उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नये अशी तरतुद आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असून दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. या मैदानात त्यांचे हेलिकॉप्टर आणि विमानेही उतरत असून त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन ठिकाणी त्यांची बॅग तपासण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल केला. त्यामुळे, नेतेमंडळींच्या बॅगा तपासण्याबाबत नियम काय आहेत, केवळ उद्धव ठाकरेंच्याच बॅगा का तपासल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचीही बॅग तपासा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केल्यामुळे खरंच इतर नेत्यांच्याही बॅगा तपासण्यात आल्या आहेत का, याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राजकीय पक्षातील नेतेमंडळींच्या बॅगा तपासण्याबाबत निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे, हे पाहूयात.
निवडणूक काळासाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमध्ये मतदारांना राजकीय पक्षांनी अथवा उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नये अशी तरतुद आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अंलबजावणी यंत्रणा आणि प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथके (एस.एस.टी.) व भरारी सर्वेक्षण पथके (एफ.एस.टी.) यांची नेमणूक केलेली असते. दरम्यान, निवडणूक आयोगाने याबाबत पत्रक प्रसिद्धी करुन माहिती दिली आहे.
स्टार प्रचारकांच्या हेलिकॉप्टर्स व विमानाची तपासणी
महाराष्ट्र राज्यात या विधानसभा निवडणुकीसाठी अशी एकूण सहा हजार पथके तैनात असून 19 अंलबजावणी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थिर सर्वेक्षण पथके व भरारी सर्वेक्षण पथके यांना प्रत्येकच वाहन तपासून संशयास्पद काही आढळले तर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत. निवडणूक काळात विविध पक्षांचे मान्यवर नेते व स्टार प्रचारक हवाई मार्गाने दौरे करतात. त्यांच्या हेलीकॉप्टर्स अथवा विमानाची देखील तपासणी केली जाते. अशा प्रकारे सर्वच नागरिकांच्या वाहनांची तपासणी केली जाते व त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अपवाद केला जात नाही.
स्थिर सर्वेक्षण पथकात कोण कोण?
स्थिर सर्वेक्षण पथक ज्याठिकाणी नेमलेले असते तेथून जाणा-या प्रत्येक वाहनाची तपासणी होते. पथकामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह महसूल व अन्य विभागाच्या कर्मचा-यांचा समावेश असतो. अशी तपासणी करताना संशयास्पद काही आढळले नाही, तर नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. संशयास्पदरित्या आढळून आलेला पैसा, दारु, मौल्यवान धातू आणि इतर वस्तू जप्त करुन नियमाप्रमाणे कारवाई केली जाते. सर्वच नागरिकांनी याबाबत सहकार्य करुन निष्पक्ष व चांगल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
गैरप्रकार दिसल्यास अॅपवर तक्रार करा
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिते दरम्यान आतापर्यंत सर्व अंमलबजावणी यंत्रणा व स्थिर तसेच भरारी पथके यांनी रु. 500 कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करुन कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मत मागगण्याच्या प्रकाराला आळा बसतो आहे. तरीही असा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला तर सीव्हीजिल अॅपवर तक्रार करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
हेही वाचा