शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Shalinitai Patil Supports Shashikant Shinde : महेश शिंदे यांनी आमचं नुकसान केलं, कोरेगावला काम करणारा आमदार हवाय असं म्हणत माजी आमदार शालिनीताई पाटलांनी शशिकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.
सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत पाटील यांची ताकद वाढली असून माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली. जरंडेश्वर कारखाना परिसरातील सर्व मतदार हे शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहतील असं शालिनीताई पाटील यांनी जाहीर केलं. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे हे निवडणूक लढवत आहेत.
महेश शिंदे विश्वासघातकी आमदार
शालिनीताई पाटील म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोरेगाव मतदारसंघातून शशिकांत शिंदे विधानसभेसाठी उभे आहेत. पाच वर्षांपूर्वी निवडून आलेले आमदार महेश शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं. परंतु ज्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला त्याच पक्षात महेश शिंदे गेले. हे अत्यंत विश्वासघाती आमदार आहेत.
शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या की, "कोरेगाव सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जरंडेश्वर कारखाना. कारखान्याच्या माध्यमातून आमचे 25,000 सभासद असून त्यांच्या कुटुंबाचे 50 हजार मतदान आहे. हे सर्व मतदार एक मताने वागतात. आम्ही शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. जनतेच्या कल्याणासाठी आम्ही काम करणारे आहोत. त्यामुळे आम्ही आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देत आहोत."
महेश शिंदे यांनी नुकसान केलं
आमदार महेश शिंदेंनी गेल्या काही दिवसापासून आमचं नुकसानच केलेलं आहे. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही कारखाना पुन्हा पूर्ववत सुरू करून सर्व उद्योग व्यवस्थित चालू करु अशा विश्वासाने कामाला सुरुवात करत आहे असं शालिनीताई पाटील यांनी बोलताना सांगितलं.
कोरेगावचा विकास करायचा असेल तर आम्हाला काम करणारा आमदार हवाय आणि तो आमदार म्हणजे शशिकांत शिंदे असल्याचंसुद्धा माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी सांगितलं.
कोरेगावात दोन आमदारांमध्ये लढत
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे विजयी झाले. त्यानंतर काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदे यांना विधानपरिषदेवर घेतलं. त्यामुळं आता होणारी विधानसभा निवडणूक दोन्ही आमदारांमध्ये होणार आहे. आमदार महेश शिंदे हे जून 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी त्यांच्यासोबत होते. दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवेळी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.लोकसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. आता ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ही बातमी वाचा: