'मी उगाच गुलाबी स्वप्न दाखवत नाही, माझ्यात स्वप्न पूर्ण करण्याची धमक'; अजित पवारांचं नाशकात वक्तव्य
Ajit Pawar Jansanman Yatra : 17 तारखेला 6 हजार कोटींच्या फाईलवर सही केली आणि काल नाशिकला आलो. आम्हाला लॉन्ग टर्म राजकारण करायचे आहे, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
नाशिक : मी उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. गुलाबी स्वप्न दाखवत नाही. अजित दादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. गुरुवारपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) नाशिकमधून सुरु झाली आहे. शुक्रवारी निफाड (Niphad) येथे झालेल्या सभेतून अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, आज नागपंचमीचा सण आहे. नागांची आपण पूजा करतो. महिला झोका खेळतात, ही आपली संस्कृती आहे. आपला ठेवा आहे. आज आदिवासी दिन आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे, महात्मा गांधी यांनी चलेजावची घोषणा आजच्याच दिवशी केली. स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज पावसाचा दिवस आहे. या पावसात सर्वजण स्वागत करत आहेत. फुलांची उधळण करत आहेत. आम्ही चांगली योजना आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. इतरही मित्र पक्षांचे सहकार्य लाभले. योजना पूर्ण करण्यासाठी घेतली आहे. आम्ही कुठल्याही योजना अभ्यास केल्याशिवाय आणत नाही. महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. त्यांना सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले.
कोणी खोटा नेरेटिव्ह सेट केला तर त्याला बळी पडू नका
लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार म्हणाले की, महिला आपल्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी काम करतात. त्यांना काही आशा असतात. मी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. काल रात्री एक बैठक घेतली. सव्वा ते दीड कोटी महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. अजूनही काही नोंदणीचे काम सुरू आहेत. यात अडचणी येत आहेत, मात्र आम्ही त्यातून मार्ग काढत आहोत. 17 तारखेला 6 हजार कोटींच्या फाईलवर सही केली आणि काल नाशिकला आलो. आम्हाला लॉन्ग टर्म राजकारण करायचे आहे. औट घटकेचे नाही. उद्या लाभ मिळाला नाहीत तर महिला मला जाब विचारतील. कोणी खोटा नेरेटिव्ह सेट केला तर त्याला बळी पडू नका, ही कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी योजना आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी 45 हजार कोटी रुपयांची योजना आहे. ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटन दाबले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला
आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, त्यानंतर सरकार पडले, कसे पडले सर्वांना माहिती आहे. आम्ही किती दिवस सांगायचे सत्तेत नाही, सत्तेत आलो म्हणून विकास कामासाठी निधी देता आला. मी कोणाला दुखवण्यासाठी निर्णय घेतला नाही मी कामासाठी आलो आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत. हवेत गप्पा मारणारी नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो. कांदा निर्यात बंदी करायची नाही. वीज बिल माफ करा, असे निर्णय आता घेतले आहेत.
गुलाबी स्वप्न दाखवत नाही
मी आता दुसऱ्यावर टिकाच करणार नाही. माझ्याकडे सांगण्यासाठी खूप कामे आहेत. मी उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. गुलाबी स्वप्न दाखवत नाही. अजित दादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे. नाशिक जिल्हा बँक सुरळीत सुरू करणार आहे. बँक कोणी मातीत घातली हे तुम्हाला माहित आहे. त्यावर जास्त बोलणार नाही ज्यांनी मातीत घातली त्यांना निवडून देऊ नका, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
आणखी वाचा