Sunetra Pawar: बारामतीसारखं मतदान करा, अजितदादा तुमच्या तालुक्याचा बारामतीसारखा विकास करतील; सुनेत्रा पवारांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Politics: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढाई प्रतिष्ठेची मानली जात आहे. बारामतीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत आहे. बारामतीत अजित पवारांना पडतं तसं मतदान करा, मग तसाच विकासही करु.
दौंड: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्याच तालुक्यातील लोक आमचा बारामतीसारखा विकास का होत नाही, असा प्रश्न विचारतात. पण बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांना जसं मतदान पडतं तसं मतदान इतर तालुक्यांमध्येही पडलं तर तुमचाही विकास बारामतीसारखाच होईल, असे वक्तव्य बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केले. त्या मंगळवारी दौंड तालुक्यातील नानगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी सभेत बोलत होत्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे रोखठोकपणे राजकीय समीकरण मांडत दौंडकरांना अजित पवार गटाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
केंद्रात आणि राज्यात समविचारी लोक असतील तर सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवता येतील. अजितदादांच्या विचाराचा खासदार आपण निवडून दिलात तर विकासाची गंगा गल्लीबोळात आणि गावगाड्यापर्यंत पोहोचेल. आप्पा (रमेश थोरात) मला म्हणाले की,सगळ्या तालुक्यातील लोकांना प्रश्न पडतो की, बारामतीसारखा विकास आमच्याकडे का होत नाही? त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की, दादांना बारामतीमध्ये जसं मतदान पडतं तसं इतर तालुक्यांमध्ये पडत नाही. तुम्ही आम्हाला त्याप्रकारचं मतदान करा, मग इथेही बारामतीप्रमाणे विकास करता येईल. बारामतीमध्ये अजितदादांसमोर उभ्या राहणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होते. इतर तालुक्यांमधील लोकांनीही अजित पवार यांच्यावर असाच विश्वास दाखवला तर तिकडेही तसाच विकास करता येईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
शाळा आणि महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करुन द्या, अजितदादा लगेच कामाला सुरुवात करतील: सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात दौंडमधील जनतेला महायुतीच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. तु्म्ही अजित पवारांना चांगल्याप्रकारे ओळखता. त्यांची कार्यपद्धती तुम्हाला माहिती आहे. अजित पवार यांनी तुमच्या तालुक्यावर किती प्रेम केलं, किती निधी दिला, हे मी सांगायला नको. आजपर्यंतचा विकास तुमच्यासमोर आहे. नानगाव हे पूर्वीपासून सधन आहे, पुढारलेलं आहे. या गावामध्ये सगळे सुशिक्षित आणि समजुतदार आहेत. तरीही या गावात दोन गट आहेत. काही दिवसांपूर्वी महायुतीच्या वरिष्ठांनी मला उमेदवारी जाहीर केली. या विश्वासाचं मी सोनं करेन. नानगावमध्ये शाळा आणि महाविद्यालय उभारण्याची मागणी आहे. अजितदादांनी सांगितलं आहे की, तुम्ही जागा उपलब्ध करुन दिली की, महाविद्यालायचं काम लगेच सुरु करु. दादांचं व्हिजन पुढील 50 वर्षांचं असतं. शाळा आणि महाविद्यालयासाठी मैदान आणि इतर गोष्टींची गरज असते. त्यामुळे महाविद्यालय उभारण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बोलल्या, म्हणाल्या...