एकनाथ खडसेंना हरिभाऊ जावळेंची बॅग घेऊन जाताना मी बघितलंय; गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ खडसे हे हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन जाताना मी त्यांना बघितलं आहे, काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो.
जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांच्यातील राजकीय वाद आता महाराष्ट्राला माहिती आहे. त्यातच, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरुन गेल्या काही दिवसांत हा वाद आणखी चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे. खडसेंनी आपल्या भाजप प्रवेशावर गौप्यस्फोट करताना स्थानिक नेते म्हणून गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे, यावर गिरीश महाजन यांच्याकडूनही पलटवार करण्यात येत आहे. "गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्रजी म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला आहे", असं म्हणत आमदार एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, आज गिरीश महाजन यांना खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा केली असता गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला.
एकनाथ खडसे हे हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन जाताना मी त्यांना बघितलं आहे, काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो. आमदाराची बॅग घेऊन ते फिरत होते, 90 च्या दशकांमध्ये त्यांना पक्षांमध्ये घेतलं, तिकीट दिलं आणि आमदार केलं, असे म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंची खिल्ली उडवली, तसेच काँग्रेसने त्यांना आमदार केल्याचं सांगितलं. 15 ते 20 वर्ष ते लाल दिव्याच्या गाडीतच फिरले, त्यांच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो ते नंतर भाजपमध्ये आले. मात्र, मी सुरुवातीपासून भाजपमध्येच आहे, असेही महाजन यांनी म्हटलंय.
तुमचं अन् माझं मताधिक्य पाहा
काही बोलायचं, बडबड करायची, तुमच्या मतदारसंघात तुम्ही का पडले. तुमची कुठली तरी ग्रामपंचायत आहे का, तुमच्या मतदारसंघात नगरपालिका तरी आहे का?, काय आहे तुमच्या मतदारसंघात, असा सवालच महाजन यांनी विचारला आहे. तसेच, एकदा 1400 मतांनी निवडून यायचं, एकदा 1800 मतांनी निवडून यायचं, तुमचं आणि माझा मताधिक्य पाहा केवढे आहे, असेही महाजन यांनी म्हटले.
सर्वच ठिकाणी आम्ही खडसेंना नामोहरम केलं
जामनेर तालुका माझ्यामुळे सुजलाम सुकलाम झाला एवढं हास्यास्पद वक्तव्य त्यांनी केलं. मुक्ताईनगरची अवस्था काय आहे, काय बोंब पडले त्या ठिकाणी, लोक शिव्या घालतात. महिना-महिनाभर मुक्ताईनगरमध्ये पाणी मिळत नाही. तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे विकास करायला का आले, असा टोलाही खडसेंना लगावला. बँक असेल दूध संघ असेल, सर्व ठिकाणी आम्ही त्यांना नामोहरण केलं आहे. जिल्हा दूध संघामध्ये चाळीसगावचे मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगरमध्ये जाऊन त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव केल्याचेही महाजन यांनी म्हटले.
हेही वाचा
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले