छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र वजाबाकीची चर्चा अधिक आहे. नाराजांचे बार अधिक मोठ्याने वाजत आहेत, विधिमंडळ अधिवेशनाची प्रथा असते.
नागपूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक नवख्या आमदारांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र, ज्येष्ठ व वरिष्ठ नेते राहिलेल्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून 4 माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व माजी गृहमंत्री राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांनाही डावलण्यात आलं आहे. याबाबत, छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे आपली नाराजी उघड केली. नागपूर अधिवेशनातून नाशिकला परत येताच त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी, पत्रकारांशी बोलताना नाव न घेता थेट अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केलं. आता, भुजबळांच्या नाराजीवर विरोधकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया दिली. तसेच, भुजबळ हे अधून मधून संपर्कात असतात, असे म्हणत महायुतीच्या नेत्यांना टोलाही लगावला.
मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र वजाबाकीची चर्चा अधिक आहे. नाराजांचे बार अधिक मोठ्याने वाजत आहेत, विधिमंडळ अधिवेशनाची प्रथा असते, मुख्यमंत्री मंत्र्यांची ओळख करून देतात, पण अनेक आरोप असेलेल्यांचा परिचय मुख्यमंत्री यांना करून द्यावा लागला, हे पहिल्यांदा घडत असेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
भुजबळांच्या बाबतीत मला वाईट वाटलं
भुजबळांच्या बाबतीत मला वाईट वाटलं, आता अनेकांच्या बद्दल मला आतून वाईट वाटतंय. कारण, जे एका अपेक्षेनं तिकडे गेले होते, तरी बरं घट्ट झालेलं जॅकीट आता तरी घालायला मिळालं. काही जणांची जॅकेट आणखी वाट पाहात असतील, त्यांच्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो, असे म्हणज छगन भुजबळांसह मंत्रिपद नाकारलेल्या आमदारांच्या नाराजीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. लाडका आमदार, किंवा लाडकी माणसं अशी सरकारची काही योजना आहे का, असेही ठाकरेंनी म्हटले. सरकारची दयना झाली आहे, त्यामुळे वहाँ नही रहना हे भुजबळांचं म्हणणं योग्य आहे. भुजबळ हे आता संपर्कात नाहीत, मात्र ते अधून-मधून संपर्कात असतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांना सूचक टोलाही लगावला आहे.
निवडणूक आयुक्तांची निवडही मतदानातून व्हावी
वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलताना हे विषय मुद्दाम आणले जात आहेत. अदानींसारखे विषय बाजूला करण्यासाठी हे आहे. निवडणूक आयुक्त देखील निवडणूक प्रक्रियेतून निवडून यायला हवेत. ती निवडणूक कशी घ्यायचे ठरवावे लागेल. तुम्ही एका गावाची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला का घाबरता? लोकशाहीची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी, त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन व्हायला नको, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची निवड देखील निवडणूक घेऊन व्हायला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ
मला मंत्रिपद मिळाले की नाही, हा प्रश्न नाही. ज्याप्रकारे माझी अवहेलना करण्यात आली, त्याबद्दल मी नाराज आहे. पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? ते सांगतील तेव्हा बसायचं, त्यांनी सांगितल्यावर उठायचं, ते म्हणाले की निवडणूक लढवायची, असा परखड सवाल विचारत छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रुफल पटेल यांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भुजबळांची नारजी दूर करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. मात्र ती ऑफर छगन भुजबळांनी धुडकावून लावली आहे. तर राष्ट्रवादीतील बहुतांश आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, असे मत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भुजबळांवर अन्याय झाला तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी भीती आमदारांमध्ये असल्याचे समजते.
हेही वाचा
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल