(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: पुण्याच्या सभेत मी मोदी-शाहांशी कशा गप्पा मारत होतो हे तुम्ही बघितलंय; अजितदादांनी हुकमाचा पत्ता बाहेर काढला
Baramati News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे सभा झाली. त्यावेळी महादेव जानकर आणि अजित पवार बोलत होते. या सभेत अजित पवारांनी आपण विकाससाठी केंद्रातून कशाप्रकारे निधी आणू शकतो, हे सांगितले.
बारामती: राज्यातील सर्वात हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती मतदारसंघातील नागरिकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा साद घातली आहे. देशात पु्न्हा मोदी सरकार आले तर मी तुमच्या विकासासाठी कशाप्रकारे निधी आणू शकतो, हे अजित पवार (Ajit Pawar) यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे शनिवारी सकाळी झालेल्या सभेत अजित पवार यांनी बारामतीकरांना विकासाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा साद घातली.
जे विरोधात आहेत, ते उसाला पाणी देतात पण त्यांना कळत नाही, हे पाणी महायुतीने आणले. नाहीतर इथे धुरळा झाला असता धुरळा. मी कामाचा माणूस आहे. हे चित्र मी बदलून दाखवीन. फक्त भावनिक होऊ नका. कोण आपल्याला कॅनॉलला पाणी देऊ शकेल, कोण आपल्या समस्या सोडवू शकेल, याचा विचार करा. तुम्ही सातवेळा मला निवडून दिले, पाचवेळा मी उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे माझी अनेक लोकांशी ओळख झाली. तुम्ही बघितलं असेल, मी पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी कशा गप्पा मारत होतो. मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे, हे मी त्यांना सांगितले. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. नाहीतर पुढची पिढी मला माफ करणार नाही. अजित पवारने सत्तेत राहून काय केले?, असा प्रश्न ते विचारतील. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भावनिक होऊन मतदान करु नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
मी बारामतीचे चित्र बदलून दाखवेन: अजित पवार
आम्हाला वडीलधारी लोकांबाबत आदर आहे. ते जे सांगतील ते आम्ही 40 वर्षे ऐकले. आता विकासासाठी हा निर्णय घेतला. कुणाला त्रास देण्याची भूमिका माझी नव्हती. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला सुनेत्रा तडा जाऊ देणार नाही. मी कामाचा माणूस आहे, हे चित्र मी बदलून दाखवेन. फक्त भावनिक होऊ नका, असे अजित पवार यांनी सांगितले.
उद्धवजी तुमच्या उमेदवारांचं डिपॉझिट कसं राहतं तेच बघतो; जानकरांचं ओपन चॅलेंज
उद्धव साहेब तुमचं डिपॉझिट कसे राहील ते बघतो, असा शब्दांत महादेव जानकर यांनी या सभेत ठाकरे गटाला जाहीर आव्हान दिले. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला राजकीय भागीदारी दिली का? इथून पुढे सत्तेत भागीदारी महत्त्वाची असेल. पुढील काळात महाराष्ट्रात धिंगाणा होणार आहे, असे महादेव जानकर यांनी म्हटले. मोदींची माझी चांगली ओळख आहे. मी परभणीला निधी देणार, पण बारामतीत देखील निधी देणार. अजित पवार भाबडा माणूस आहे. उद्याचा विकास पुरुष अजितदादा आहे, असेही जानकर यांनी म्हटले. यावेळी जानकरांनी सुप्रिया सुळे यांना टोलाही लगावला. बहिणीचं लग्न झाल्यावर भावाच्या घरात राहायचं नसतं, आपल्या घरी जावे. भाऊ म्हणून सोन्याची साडी घेऊ, असे महादेव जानकर यांनी म्हटले.
आणखी वाचा
मोदी म्हणाले शरद पवार हे 'भटकती आत्मा', अजित पवार म्हणाले पुढच्या सभेत मोदींना विचारणार