(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : मोदी म्हणाले शरद पवार हे 'भटकती आत्मा', अजित पवार म्हणाले पुढच्या सभेत मोदींना विचारणार
Ajit Pawar Reaction On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटल्यानंतर त्यावर अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख भटकती आत्मा असा केल्यानंतर त्यावर आता राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. यावर आता शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit Pawar) सावध प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा असा उल्लेख कुणाचा केला, त्यामागचा नेमका उद्देश काय होता हे पुढच्या सभेत त्यांना विचारणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ज्यांची इच्छा कधीही पूर्ण होत नाही त्यांचा आत्मा भटकता राहतो असं म्हणत नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यावरून राज्यात विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता अजित पवारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही. नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा कुणाला म्हटलं हे माहिती नाही. पण पुढच्या वेळच्या सभेला ते भेटतील त्यावेळी त्यांनी भटकती आत्मा कुणाला म्हटलं हे त्यांना विचारणार आहे, त्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे तो विचारणार.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर बोचरी टीका केली. मोदींनी पवारांचं नाव घेतलं नाही, मात्र भटकती आत्मा हा शब्दप्रयोग कुणाला उद्देशून होता हे सर्वांच्याच लक्षात आलं. महाराष्ट्रात गेल्या 45 वर्षांपासून वारंवार राजकीय अस्थिरता निर्माण झाली, त्यामागे ही भटकती आत्मा होती असं मोदी म्हणाले होते.
माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ, शरद पवार यांचं प्रत्युत्तर
महाराष्ट्रात एका भटकत्या आत्म्याकडून नेहमी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका नरेंद्र मोदींनी केल्यानंतर त्याला आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच दुःख पाहून आपला आत्मा अस्वस्थ असल्याचं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं आहे. ते म्हणाले की, शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आल्याचं वक्तव्य एकेकाळी नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यानंतर आता ते माझ्यावर टीका करत आहेत. माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे, पण तो लोकाचं आणि शेतकऱ्यांचं दुःख पाहून अस्वस्थ आहे. लोक महागाईने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी मी शंभर वेळा अस्वस्थ होईन.
ही बातमी वाचा: