Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
महायुती सरकारमध्ये ओबीसी चेहरा असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी न देण्यात आल्याने काही ओसीबी नेते नाराज झाले आहेत.
नाशिक : राज्य मंत्रिमंडाळाच्या विस्तारात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र, दिग्गज नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची (Minister) संधी मिळाली नाही. तर, गृहमंत्री राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिपदाच्या शर्यतीतून वगळण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 4 माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून छगन भुजबळांनाही संधी न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी उघड केली. नागपूर येथील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते विधिमंडळात गेले होते. मात्र, नागपूरहून नाशिकला परत येताच त्यांनी आता मी अधिवेशनाला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, आता मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटले.
महायुती सरकारमध्ये ओबीसी चेहरा असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी न देण्यात आल्याने काही ओसीबी नेते नाराज झाले आहेत. तर, भुजबळ समर्थकांनी देखील अजित पवारांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, छगन भुजबळ यांनीही तीव्र शब्दात नाराजी बोलून दाखवली आहे. मनोज जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मला मिळालं, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पण वरिष्ठ व अनुभवी नेते असलेल्या भुजबळांना स्थान न मिळाल्याने ते आज नागपूरहून थेट नाशिकला परत फिरले आहेत. नाशिकमध्ये येताच त्यांनी शांतपणे संतापजनक प्रतिक्रिया दिली.
तुम्ही नाराज आहात का, कशामुळे नाराज आहात असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावेळी, मला जेवायला न मिळाल्याने मी नाराज आहे, काय प्रश्न विचारता असे म्हणत शांतपणे भुजबळांनी संताप व्यक्त केला. तसेच, नागपूरच्या अधिवेशनाला आता जाणार का, या प्रश्नावर नाही. मी अधिवेशनाला जाऊन हजेरी लाऊन आलोय, आता जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, भुजबळ यांनी नाराजी व मनातील खदखद पुन्हा उघड झाली आहे. दरम्यान, छगन भुजबळ नाशिकला परत आले असून आता मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर, पुढील भूमिका जाहीर करतील. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचे चर्चा आहे. त्यावरही त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. मी राज्यसभेवर जाणार नाही, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल