राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात सगळे बोलले, अजित पवारांना संधी का नाही?
Nationalist Congress Party: दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8 व्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले आहे. राष्ट्रीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा झाल्याची माहिती समोर येत आहे.
Nationalist Congress Party: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या अधिवेशनात आज चर्चा झाली ती एका न झालेल्या भाषणाची. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आज पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलण्याची संधी मिळाली नाही. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे (Supriya Sule), अमोल कोल्हे (Amol Kolhe), फौजिया खान, केरळचे पीसी चाको, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष शास्त्री यांच्यासह अगदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा या सगळ्यांना व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली.
प्रफुल्ल पटेल एकापाठोपाठ एक वक्त्याचे नाव जाहीर करत होते. ज्यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही भाषण झालेले नाही, हे लक्षात आलं त्यानंतर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. पण जयंत पाटील (Jayant Patil) यांचा क्रमही प्रोटोकॉल नुसार खूप चुकलेला होता. जयंत पाटील सुरुवातीला भाषण करायला आढेवेढे घेत होते. पण आग्रह झाल्यानंतर ते उठले. त्यांच्या भाषणानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांचं नाव जाहीर केलं. पॉप्युलर डिमांड म्हणून आता अजित पवार बोलतील असं ते म्हणाले पण त्या क्षणाला अजित पवार व्यासपीठावर नव्हतेच. हा सगळा गोंधळ शरद पवारांच्या (Sharad Pawar) समोरच घडत होता. मग सारवासारव करत प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले की, अजित पवार हे वॉशरूमला गेले आहेत ते थोड्याच वेळात येतील.
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. तोपर्यंत अजित पवार व्यासपीठावर येतील, अशी अपेक्षा होती. पण तरीही अजित पवार पोहोचले नाहीत. त्यामुळे शेवटी शरद पवार यांचा समारंभाचे भाषण सुरू झालं आणि या संपूर्ण अधिवेशनात अजित पवारांचे भाषण झालंच नाही. मागे पंतप्रधानांच्या देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू दिले गेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टीका सुरू करण्यात आली होती. आज दिल्लीतल्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या व्यासपीठावर त्यांना स्थान मिळाले नाही. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे खासदार आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना प्रामुख्याने स्थान होतं, असं आयोजकांनी खासगीत बोलताना सांगितलं.
इतर महत्वाची बातमी:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात सगळे बोलले, अजित पवारांना संधी का नाही?
शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र, प्रभादेवी येथील राड्यानंतर उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचं कौतुक