Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Jaykumar Gore : भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोनाकाळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मुंबई : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी कोरोना (Corona) काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. आज जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दीपक आप्पासाहेब देशमुख (मायणी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, मायणी-खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते.
200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप
या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे हे होते. कोरोना काळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे वापरण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला. भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटले. सरकारने मोफत कोरोना उपचारांसाठी सर्व रुग्णालय, कोरोना सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषध व इंजेक्शन पुरवली होती. मात्र गोरे व त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळले असे गंभीर आरोप करण्यात आले आहे.
गैरव्यवहाराच्या सखोल तपासणीची मागणी
कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली याप्रकरणी जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली व्हावा, अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायामूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार असून या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
रोहित पाटील उतरणार विधानसभेच्या आखाड्यात? वाढदिवसाच्या निमित्तानं मांडलं राजकीय गणित