गुलाबराव पाटलांची रवी राणांना समज, म्हणाले, विनोदातही लाडकी बहीणचे पैसे काढून घेण्याचं वक्तव्य करु नका!
Gulabrao Patil on Ravi Rana : यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. जर आशीर्वाद दिला नाही तर मी 1500 रुपये परत घेईन, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले.
Gulabrao Patil on Ravi Rana : राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा होत आहे. विरोधकांनी या योजनेवरून महायुती सरकारला (Mahayuti Government) चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच महायुतीमध्ये असलेले अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली. यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असे वक्तव्य त्यांनी केली. यावरून रवी राणांवर टीकेची झोड उठत आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी रवी राणा यांनी चांगलीच समज दिली आहे.
विनोदातही लाडकी बहीणचे पैसे काढून घेण्याचं वक्तव्य करु नका
रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. सरकारने आणलेली योजना आहे. विनोदात म्हंटले असतील तरी ते चुकीचेच आहे. विनोदातही लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेण्याचे वक्तव्य करु नका, अशी समज त्यांनी रवी राणा यांना दिली आहे.
खासदार बळवंत वानखडे यांचा रवी राणांवर पलटवार
काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनीही रवी राणांवर चांगलाच पलटवार केलेला आहे. ज्या शासकीय योजना असतात त्या योजना शासनाला राबवायच्या असतात. शासकीय योजना ही कोणाच्या बापजाद्याची योजना नसून ते सरकारची असते. जनतेच्या टॅक्समधून जमा झालेले पैसे असतात. त्यामुळे अशा योजनेतील पैसे हे कोणी काढून घेऊ शकत नाही, असा टोला खासदार बळवंत वानखडे यांनी आमदार रवी राणा यांना लगावला आहे.
रवी राणांच्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध
अपक्ष आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतील निधीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी आक्रमक होऊन तीव्र आंदोलन केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांचा प्रतिकात्मक पुतळा पायदळी तुडवला आहे. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र तुम्ही जर महिलांना धमकीवजा इशारा देत असाल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही. आपल्या लाडक्या बहिणीला धमकी देणारा भाऊ, हा लाडका भाऊ नसून बहिणीची ओवाळणी खाणारा भाऊ आहे, असा संताप यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
Sanjay Raut : 'आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार'; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य