Walmik Karad: वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले
Beed News: केज शहरातील विष्णू चाटे यांच्या कार्यालयामध्ये वाल्मीक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी सुदर्शन घुले त्याच्यासोबत आला होता. आवादा कंपनी खंडणी प्रकरण
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा पाय आणखी खोलात जाईल, असा पुरावा समोर आला आहे. हा वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जात आहे. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्यादिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हेदेखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्यादिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता सीआयडी आणि एसआयटीकडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेर हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड याच्यावतीने विष्णू चाटे याने आवादा कंपनीकडे तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आवादा कंपनीत गेला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला. हा सुरक्षारक्षक संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील होता. त्यामुळे संतोष देशमुख कंपनीत गेले होते आणि त्यांचा विष्णू चाटेसोबत वाद झाला होता. यानंतर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
आणखी वाचा
वाल्मिक कराडचं पुणे कनेक्शन, भाजपचा नेता अडचणीत; CID कडून अडीच तास चौकशी